लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत नाराजीचा फटका टाळण्यासाठी सरकारच्या ‘हालचाली’

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत महायुतीसह सत्ताधारी भाजपला कांदा निर्यात बंदी, दूध दरवाढ यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील शेतकऱ्यांच्या या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीच्या हालचाली सुरू झाल्या आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांना लवकरच खूश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यांना ३१ जागांवर यश मिळाले आहे. मात्र यात अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा भाजपला सामना करावा लागला आहे.

विशेष करून कांदा, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले. कांदा निर्यातीचे सतत बदलणारे धोरण, दुधाचे पडलेले भाव, शेतमालाचे कोसळलेले दर, रासायनिक खते, बियाण्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला असताना सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी त्याची दाखल घेतली नाही.

उलट पशुखाद्यासह खाते व बियाणे यांच्या किमती वाढवल्या. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांत शेतकऱ्यांचा हा उद्रेक दिसला. शेतकऱ्यांचा हाच उद्रेक महायुतीच्या पराभवासाठी जबाबदार ठरल्याचे विश्लेषण झाले.

भाजपकडून दाखल झालेल्या अहवालातही ही बाब अधोरेखीत झाली आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या आमदारांनीही शेतकऱ्यांमधील असलेली नाराजी बोलून दाखविली आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यात प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफीचाही समावेश केला आहे. राज्य सरकार पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू असल्याबाबत महायुतीमधील अनेकांकडून सांगण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारच्या या आदेशाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, अद्याप या संदर्भात पत्र आले नसले तरी स्थानिक जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्जाची माहिती घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

नगर जिल्हा बँकेकडून गेल्या वर्षीचे व यंदाच्या पीक कर्जच्या वाटपाची माहिती सहकार खात्याने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe