अहिल्यानगर- जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशी, विदेशी दारू, बीअर आणि वाईनच्या विक्रीने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. शासनाच्या उत्पन्नात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या या व्यवसायातून तब्बल २,४१४ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात आला आहे. विक्रीत सतत वाढ होत असून, ऑक्टोबर महिन्यात एकट्या २२८ कोटींची दारू विक्री झाली.
मागणी वाढली
गेल्या काही वर्षांत सर्व वस्तूंसह दारूच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. तरीही दारूच्या मागणीवर याचा फारसा परिणाम झाला नाही. देशी-विदेशी दारू, बीअर आणि वाईनची विक्री वाढतच आहे. विशेषतः सण-उत्सव काळात ही विक्री उच्चांक गाठते. कोरोनानंतर या मागणीमध्ये आणखी झपाट्याने वाढ झाली.

दारू व्यवसायात वाढती मागणी लक्षात घेऊन नव्या कंपन्या मोठ्या संख्येने या क्षेत्रात उतरल्या आहेत. हॉटेल, बीअर बार, वाईन शॉप्स यांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. विक्रीसाठी अधिकृत वितरक नेमले गेले असून, त्यांच्यामार्फत देशी आणि विदेशी दारूची घाऊक व किरकोळ विक्री सुरू आहे.
उत्पन्नात वाढ
राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २,८७९ कोटी रुपयांचे उत्पन्न उद्दिष्ट ठरवले होते. त्यापैकी २,४१४ कोटींचे उत्पन्न जिल्ह्याने पूर्ण केले असून, हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २१० कोटी रुपयांनी अधिक आहे. ही आकडेवारी ८३ टक्के उद्दिष्टपूर्ततेवर पोहोचली आहे. सन २०२२-२३ मध्ये २,२०३ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते.
महिन्याला कोटींची विक्री
जिल्ह्यात दर महिन्याला १५० ते २०० कोटी रुपयांची दारू विक्री होत आहे. बाराही महिने या विक्रीने “शंभरी” गाठली आहे. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असून, अन्य क्षेत्रांतील तुट भरून काढण्यासाठी दारू विक्री हा आर्थिक कणा बनलेला आहे.