Ahmednagar News : तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील ओंकार ग्रुपच्या गोरी शुगर अँड डीस्लरिज या खाजगी साखर कारखान्याने परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या पाझर तलावात सोडलेल्या मळी आणि आरोग्यास घातक असलेले रसायन मिश्रित पाण्यामुळे पशू-पक्षी,
जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभाग, कारखाना प्रशासन, पर्यावरण नियंत्रण महामंडळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
तरी या प्रकरणी पर्यावरण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन कारखाना प्रशासनावर त्वरित कडक कारवाई करावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील ओंकार ग्रुपच्या गौरी शुगर अँड डीस्लरिज साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात कारखान्यातून निघणारे मळी तसेच आरोग्यास घातक असलेले रसायन मिश्रित पाणी हे शासनाच्या नियमाप्रमाणे टँकरमध्ये भरून साठवणूक न करता रस्त्यावर, शेतकऱ्यांच्या शेतात तसेच अन्य ठिकाणी सोडणे गरजेचे असते
परंतु कारखाना प्रशासनाने शासनाच्या निर्णयाला तिलांजली वाहत नियम व अटी धाब्यावर बसवत कारखान्याच्या जवळच असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पाझर तलावात सोडले आहे. रसायन मिश्रित पाण्यामुळे परिसरातील सुमारे दोनशे ते अडीचशे लोक संख्या असलेल्या बनकर मळा, जाधव वस्ती,
ठवाळ मळा येथील विहीर तसेच बोअरवेलचे पाणी दूषित झालेले असल्याने गाय म्हैस शेळ्या मेंढया या जनावरांसह माणसांचा तसेच वन्य जीवांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रसायन मिश्रित पाणी पिण्याने वन्य प्राण्यांचा जीव आणि आरोग्य धोक्यात आले आहे.
तसेच दूषित पाण्यामुळे शेतातील उभे पीक खराब पाणी दिल्याने धोक्यात आले असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यामळी मिश्रित पाण्याची परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मला या बाबत काही माहिती नाही..
मागील दीड महिन्यापासून कारखाना कार्यस्थळावर गेलो नसल्याने मला या बाबत काही माहिती नसल्याचे सांगत या प्रकरणी कार्यकारी संचालक यांच्याशी संपर्क करावा असे सांगत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.– बाबुराव बोत्रे, चेअरमन ओंकार ग्रुप
पुढील कारवाईसाठी अहवाल पाठविला आहे
कारखान्याची १ डिसेंबर २०२३ रोजी तपासणी केली असता तेथे सांडपाणी सोडल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना २१ फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पुढील कारवाई साठी नाशिक येथील रिजनल कार्यालयात तपासणी अहवाल पाठविला आहे.
रिजनल ऑफिस सूचना येताच कारवाई करणार. –चंद्रकांत शिंदे उपप्रादेशिक अधिकारी एम.पी.सी.बी. अहमदनगर