महाराष्ट्र सरकारने नुकतीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली आहे, या याजनेंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
त्यानुसार महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या वतीने नियमावली देखील जाहिर करण्यात आली आहे. त्या नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे,
तरीही एकूणच महिलांमध्ये लाडकी बहिण योजनेची मोठी चर्चा सुरु झाली असून, ही योजना महाराष्ट्रात लाडकी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरी भागापासून ग्रामीण भागा पर्यंत घराघरांत सध्या केवळ लाडक्या बहिणीचीच चर्चा रंगात आहे.
प्रत्येकजण आपल्या घरातून किती महिला या योजनेच्या लाभार्थी ठरू शकतात, याचा कानोसा घेत आहेत. इतर योजनेच्या लाभार्थी नसलेल्या सर्व महिला सध्या लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करताना दिसत आहेत.
दरम्यान, बहिणीच्या कागदपत्रांची पूर्तता करताना दाजीबांचा चांगलाच घाम निघत आहे. अनेक जावई सासुरवाडीला फोन करून आपल्या मुलीचा प्रवेश निर्गम उतारा त्वरीत पाठवा म्हणून साकडे घालत आहेत तर तिकडे गावात सासरेबुवा व मेव्हुणे मुली व बहिणीच्या प्रवेश निर्गमासाठी शाळेचे उंबरठे झिजवत आहेत.
एकाच वेळी अनेक प्रवेश उताऱ्यांची मागणी होत असल्याने मुख्याध्यापकांना दररोज प्रवेश रजिस्टरमध्ये ही नावे शोधण्याचे काम लागले आहे. प्रत्येकजण आताच कागद द्या म्हणून विनंती करत आहेत, अशा वेळी या कागदपत्रांसाठी आलेल्या प्रत्येकाचेच मन राखताना शाळा प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे.
दरम्यान, ही योजना प्रत्यक्षात किती फलदायी ठरणार आहे, हे पाहण्यासाठी अजून अवकाश असला तरी सध्या घराघरांतून मात्र लाडक्या बहिणीच्या या अनोख्या योजनेचीच चर्चा रंगताना दिसत आहे. आता लाडक्या बहिणीला १ जुलैपासून बँक खात्यात पैसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.