Maharashtra HSC Result 2022 LIVE : बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार…

Maharashtra HSC Result 2022 LIVE :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (८ जून) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.

राज्य मंडळातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी हा निकाल १० जूनच्या आसपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्षात दोन दिवस आधीच निकाल जाहीर होत आहे.

मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेची निकाल प्रक्रिया राज्यभरातील विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षा संपल्यानंतर एप्रिल महिन्यापासून लगेचच सुरू करण्यात आली होती.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्व विभागीय मंडळांचे निकाल राज्य मंडळाकडे जमा करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार १० जूनच्या आत राज्यमंडळाला हा निकाल जाहीर करणे बंधनकारक असल्याची माहिती विभागीय मंडळामार्फत देण्यात आली.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. www.mahresult.nic.in, https://www.mahahsscboard.in/