श्रीरामपूर विभागातील महावितरण कंपनीच्या सात्रळ कार्यालयात कार्यरत असलेल्या तंत्रज्ञाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष उत्तम तागड (वय ४३, रा. वडुले, ता. नेवासा) यांनी बुधवारी (दि. २०) रात्री टोकाचा निर्णय घेतला.
या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तागड यांच्यावर गुरुवारी दुपारी वडुले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संतोष तागड हे मागील १४ वर्षांपासून महावितरणमध्ये कार्यरत होते. त्यांनी पुणे, पाथर्डी, नेवासे आणि सात्रळ येथे सेवा दिली होती. मात्र, त्यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवून मे २०२४ मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली.
यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. निलंबनानंतर त्यांनी सात्रळ कार्यालयात जानेवारी २०२५ मध्ये पुन्हा रुजू होण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे.
महावितरणच्या श्रीरामपूर विभागांतर्गत ही दुसरी आत्महत्या असल्याचे समोर आले आहे. दीड वर्षांपूर्वी देवळाली प्रवरा येथील कार्यालयात काम करणारे कर्मचारी संदीप पाटोळे यांनीही आत्महत्या केली होती.
महावितरणमधील कामाच्या तणावामुळे आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या दबावामुळे कर्मचारी मानसिकदृष्ट्या त्रस्त होत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे. मयत संतोष तागड यांचे बंधू योगेश तागड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून संतोष यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
त्यांनी सांगितले की, गेल्या १४ वर्षांमध्ये संतोष यांनी कधीही गैरव्यवहार केला नाही, तरीही त्यांना अन्यायकारकपणे निलंबित करण्यात आले. तसेच, त्यांच्यावर वारंवार कामात हलगर्जीपणा आणि उशिरा येण्याचे आरोप लावले जात होते.
नाशिक येथे ४ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान प्रशिक्षणासाठी गेलेल्या तागड यांनी त्यानंतर सात्रळ येथे हजर न झाल्यामुळे त्यांच्यावर अधिक दबाव वाढला होता. सध्या श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांच्या आरोपानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.