Ahmednagar News:राज्यात नवे सरकार आल्यानंतर प्रलंबित धोरणात्मक विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच जिल्हा विभाजनाचा विषयही पुढे आला आहे.
३० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक, मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तेथे नाशिकचे विभाजन करून मालेगाव जिल्हा तयार करण्यचा विषय पुन्हा तापविण्यात आला आहे.

माजी कृषी मंत्री आणि शिंदे गटात प्रवेश केलेले दादा भुसे यांच्यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याने मुख्यमंत्री शिंदे यंच्याकडून यासंबंधी महत्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अहमदनगरच्या विभाजनाच्या जुन्या मागणीचे काय होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
मालेगाव जिल्हा निर्मितीच्या माध्यमातून माजी मंत्री भुसे यांची राजकीय वाटचाल अधिक सोपी करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्याकडून केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. आतापर्यंत शिंदे सरकारचा अनुभव घेतला तर राजकीय सोय लक्षात घेऊन धडाकेबाज निर्णय घेतले जात आहेत.
त्यानुसारच हा निर्णय होईल, अशी मालेगावकरांना आशा आहे.तर दुसरीकडे नगरच्या विभाजनाचाही प्रश्न प्रलंबित आहे. उत्तर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे करायचे, यावरून हा मुद्दा अडतो. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये यासाठी रस्सीखेच सुरू आहे.
राज्यपातळीवरून या दोघांनाही दुखवायला नको, म्हणून आतापर्यंत निर्णय होत नव्हते. शिवाय यातून राजकीय सोय काय होणार? हे गणितही प्रभावीपणे पुढे येत नव्हते. आता मालेगाव जिल्हा जर झाला तर नगरच्या विभाजनाला चालना मिळणार का? सत्तेत असलेले विखे पाटील आणि विरोधातील थोरात यांची काय भूमिका राहील, याकडे लक्ष लागले आहे.