४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर: पहिली एसटी बस नगरहून पुण्याकडे पहिल्यांदा जेथून धावली त्याच परिसरात ७० वर्षांपूर्वी ऐतिहासिक माळीवाडा बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली.सात दशकांचे उन्हाळे-पावसाळे झेललेले हे माळीवाडा बसस्थानक काळाच्या ओघात जीर्ण झाले.आता या ऐतिहासिक बसस्थानकाची नवनिर्मिती सुरु झाली असून त्यासाठी जुने बसस्थानक मागील आठवड्यातच भुईसपाट करण्यात आले आहे.
नवनिर्मितीनंतर देखण्या स्वरूपात माळीवाडा बसस्थानक प्रवासी सेवेसाठी पुन्हा एकवार रुजू होईल.प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्यधारण करीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने नगरहूनच पुण्याकडे पहिली धाव घेतली, त्यास ७५ वर्षे पूर्ण झाली.
माळीवाडा वेशीबाहेर असलेल्या पटांगणातून प्रवाशांना घेऊन पहिली बस पुण्यासाठी रवाना झाली होती. एसटीचे पहिले वाहक चालक कर्मचारी देखील नगर मधीलच होते.साडेसात दशकापूर्वी सुरू केलेली ही प्रवासी सेवेची वाट नंतरच्या काळात राज्यातील गावखेड्यापासून महानगरापर्यंत विस्तारत गेली.अहोरात्र धावणाऱ्या या एसटीने महाराष्ट्राच्या प्रगतीत पथदर्शी योगदान दिले.
म्हणूनच महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी देखील एसटीची ओळख आहे.नगर शहरातील ज्या परिसरातून पहिली एसटी बस प्रवासी घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झाली ती जागा पुढे १९५२ यावर्षी एसटी प्रशासनाने विकत घेतली. याच जागेवर १९५४ यावर्षी ३ लाख ६५ हजार ७०० खर्चुन सध्याच्या माळीवाडा बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली.तेव्हांपासून नगरचे माळीवाडा बस स्थानक राज्यभरातील प्रवाशांच्या ओळखीचे ठिकाण बनले.
या प्रदीर्घ वाटचालीत बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली.काळानुरूप इमारत एकीकडे जीर्ण होत गेली असतानाच प्रवाशांची आणि एसटी बसेसची वाढती वर्दळ यामुळे माळीवाडा बस स्थानकाच्या नवनिर्मितीची गरज भासू लागली.नगर शहर मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आमदार संग्राम जगताप यांनी तसेच तत्कालीन लोकसभा सदस्य डॉ. सुजय विखे पाटील माळीवाडा बस स्थानकाच्या पुनर्निर्मितीसाठी विशेष पाठपुरावा केला.
यास शिंदे-फडणवीस-पवार यांच्या तत्कालीन सरकार मधील महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाठबळ मिळाले. सन २०२२-२३ मध्ये माळीवाडा बस स्थानकाचे बांधकामाचा नवा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. त्यास दि.१२ जून २०२३ रोजी १६ कोटी रुपये निधीची रितसर मान्यता मिळाली.या कामाची टेंडर प्रोसेस पूर्ण होवून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
आता माळीवाडा बसस्थानकाची नव्याने निर्मीत होणारी इमारत दोन मजली असणार आहे. एकूण २० फलाट राहाणार असून ८ हजार ६०० स्वे. मि.च्या जागेत ३ हजार स्वे.मि. चे बांधकाम होणार आहे. तत्कालीन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, तत्कालीन विभागीय स्थापत्य अभियंता राम राशिनकर, कनिष्ठ अभियंता संजय दरेकर यांच्या निगराणीत वरिष्ठ पातळीवरील निर्देशानुसार या कामाचा आराखडा सादर करण्यात आला होता.
सध्या माळीवाडा बसस्थानकाच्या पुनर्निमितीसाठी विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्या निर्देशात विभागीय स्थापत्य अभियंता कैलास काळभोर, कनिष्ठ अभियंता संजय दरेकर जबाबदारी पार पाडत आहेत. नोव्हेंबर २०२४ मधील दिवाळीनंतर जुने झालेले माळीवाडा बस स्थानक उतरविण्याचे काम सुरु झाले.सरत्या वर्षा अखेरीस माळीवाडा बसस्थानक भुईसपाट करण्यात आले.तूर्तास पोस्टाची आस्थापना स्थलांतरीत होणे बाकी आहे.
जामखेड-नेवासा-पाथर्डी-शेवगांव-पारनेर- श्रीगोंदा-कर्जत-श्रीरामपूर-संगमनेर-अकोले-नगर तालुक्यातील ग्रामीण फेऱ्या आणि नाशिक- बीडकडे जाणाऱ्या एसटी बसेस माळीवाडा बसस्थानकातून सुरु आहेत. येथील वाहतूक पर्यायी जागेत स्थलांतरित झाल्याखेरीज बांधकाम वेगाने होणे शक्य नाही. त्यासाठीचे नियोजन विभागीय वहातुक अधिकारी रामनाथ मगर यांचे मार्फत सुरु आहे.
पायाभरणीपासून साधारण दिड वर्षात माळीवाडा बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम होणे अपेक्षित आहे. निर्धारित मुदतीत काम पूर्ण झाल्यावर मागील पाच पिढ्यांच्या जीवनातील वाटचालीचे साक्षीदार असलेले माळीवाडा बस स्थानक पुनःश्च हरी ओम म्हणत नवे रूपडे घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होईल.