Ahmednagar News : मनोज जरांगे व लाखो समाज बांधव आज (२२ जानेवारी) अहमदनगरमध्ये आहेत. सकाळी बाराबाभळी येथून ते मुंबईकडे निघाले. मदरशामधून बाहेर पडताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना अनेक गोष्टींना हात घातला.
मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता मागे हटणार नाही असे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचे भाष्य केले.

ओबीसी समाज व मराठा समाज हे एकमेकांच्या मदतीला धावून जातात. एकमेकांना बैल, औत आदींसह अनेक गोष्टींची मदत करतात. एकमेकांच्या लग्नात आम्ही वाढायला असतो असे आमचे प्रेम आहे.
परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्या मुले दोन समाजात तेढ झाल्याचे दिसते असे ते म्हणाले. असे असले तरी गावोगावी, खेडोपाड्यात मात्र आम्हाला ओबीसींचा पाठिंबा आहे असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘थोडासा धीर धरा’ असे वक्तव्य केले होते. त्याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता ते म्हणाले की, आता धीर किती धरायचा तेच कळेना.
त्यांनी एकदा समोर येऊन बोलावं, त्यांना सात महिन्याचा वेळ दिला काही झाले नाही, सात महिन्यात ते कधी भेटायलाही आले नाहीत. त्यामुळे त्यांनी येऊन एकदा भेटावं व दूध का दूध व पाणी का पाणी करावं असे जरांगे म्हणाले.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार
मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार का? असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न सुटला की त्यांच्यासाठीही लढा देणार आहे.
तसेच धनगर बांधवांसाठीही लढा देणार आहे असे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात ते मुस्लिम बांधवांसाठी व धनगर समाजसाठी लढा देतील असे दिसते.