तुमच्या एक-दोन सिटा पडल्या की तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या, तर आमच्या लेकरांच्या आयुष्याचे वाटोळे झाले तर आम्हाला किती वेदना होत असतील ? आमच्या मराठा समाजातील लेकरांचे शिक्षणात वाटोळे झाले, तेव्हा तुम्हाला आमच्या वेदना दिसल्या नाहीत. तेव्हा सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये, असा सज्जड इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला.
परभणीत मराठा आरक्षण जनजागृती अन् शांतता रॅली रविवारी दुपारी ३.३० वाजता जिंतूर रोडवरील नूतन शाळा मैदानावरून काढण्यात आली. शहरातील नूतन शाळा, नानलपेठ, गांधी पार्क येथून मुख्य बाजारपेठमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रॅलीचा समारोप झाला.
समारोपप्रसंगी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, परभणीकरांनी दाखवलेली ताकद सरकारला धडकी भरवणारी आहे. सत्ताधारी पक्षातील सर्व मराठा नेते, आमदार, मंत्री यांनी आता तरी मराठा समाजाच्या बाजूने उभे राहावे, अन्यथा आगामी निवडणुकीत मराठा समाज काय करेल याची जबाबदारी माझी नसेल.
आता माघार नाही. आरक्षण न दिल्यास उभे करायचे की पाडायचे याचा निर्णय बैठकीत घेऊ, अन्यथा २८८ गेलेच म्हणून समजा, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. हा संघर्ष पुढील पिढीसाठी असून आता नाही तर कधीच नाही, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांचे ऐकून सरकार मराठा समाजाला न्याय देत नसेल तर ही सरकारची मोठी चूक आहे.
छगन भुजबळ आणि सरकारने ओबीसी नेत्यांना आपल्या विरोधात ताकदीने लढायला लावले तर आरक्षण नसलेले मराठा किती ताकदीने उसळतील याचा सरकारने विचार करावा. ज्यांची नोंद सापडली त्यांच्या नोंदीच्या आधारे त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही आपली प्रमुख मागणी आहे.
आतापर्यंत ओबीसी मतांची भीती सरकारला होती; परंतु लोकसभा निवडणुकीत मराठ्यांचा कचका कसा असतो ते कळले, ते आता नादी लागणार नाहीत. मी खंबीर आहे. तुमची ताकद आहे. ते मला अडाणी समजतात, परंतु आता मी खुट्टा ठोकला आहे. भुजबळ हे मराठा समाजाच्या जीवावर आमदार, मंत्री झालेत.
आता ते मी म्हणालो तरीही निवडून येणार नाहीत, असे सांगत भुजबळांवर जरांगे-पाटील यांनी तोफ डागली. मंत्री चंद्रकांत पाटील हे सरकारची सुपारी घेऊन बोलत आहेत. तसे करू नका, आधी सूचना नीट वाचा. तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यातील फरक कळत नाही, असा आरोप त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, आमच्याबद्दल गैरसमज पसरवला व तो मी भरून काढणार. परंतु, तुम्ही भुजबळांचे ऐकून केसेस मागे घेतल्या नाहीत, उलट खेळी खेळली. ओबीसी नेत्यांना मराठ्यांच्या विरोधात भडकवले. सत्ताधारी पक्षातील मराठा नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे जाऊन बसावे व आरक्षण देऊन टाका, असे सांगावे. आरक्षण दिले तर आम्ही तुमच्या विरोधात बोलणार नाही. सरकारला हा अंतिम इशारा आहे, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
१३ जुलैपर्यंत मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण व सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली तर ठीक, अन्यथा तुमचे २८८ आमदार गेले म्हणून समजा. जर आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाजाची विराट बैठक घेऊन २८८ उमेदवार उभे करायचे की पाडायचे, हे ठरवू, मराठा समाजाच्या मुलांना त्रास देऊ नका.
तुमचा एक-दोन उमेदवार पडले तर एवढा त्रास होतो, आमचे किती पडतात. आमचे हजारो बांधव आत्महत्या करत आहेत. तरी सरकार आरक्षण देत नाही. आम्ही एकजुटीने मतदान केले तर आम्ही जातीवादी कसे? असा प्रश्न करत तुम्ही किती वर्षांपासून एकजुटीने मतदान करता आम्ही कधी काय म्हणालो का? होय, आम्हीदेखील आता जातीसाठी कट्टर आहोत. असे देखील मनोज जरंगे म्हणाले.