Ahmednagar News : सध्या अनेक ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरु आहे. त्यासाठी गर्दी गोळा करण्याचेही टार्गेट दिले जात आहे. परंतु हे लाभार्थी नेण्यासाठी एसटी बसेसचा वापर केला जातो.
त्यामुळे ऐनवेळी तिकडे बस नेल्याने इकडे बसेसच्या अनेक फेऱ्या ऐनवेळी रद्द कराव्या लागतात. परंतु याचा फटका मात्र सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. असेच काहीसे चित्र अहमदनगर जिल्ह्यातही दिसले.

पाथर्डी तालुक्यातील काही ठिकाणी प्रवाशांची चांगलीच हाल झाली. कारण काल अमावस्या निमित्त मढी, मोहटादेवीला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. तसेच लग्न समारंभ असल्याने तिकडे जाणारे प्रवासी, कामानिमित्त जाणारे चाकरमाने आदींची गर्दी होती.
परंतु या सर्व प्रवाशांना बसेस अभावी घरीच परतावे लागले. ऐनवेळी १९ बसेस रद्द केल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. अशावेळी खासगी वाहतूकदारांनी अडवणूक करत जास्त पैसा उकळला तो संताप तर वेगळाच.
त्याचे झाले असे की, मुंबई विभागात न्हावासेवा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम असून नगर विभागातील आगार निहाय बस मुरबाड येथे नेण्यात आल्या आहेत. जशी गरज लागेल तसे त्याचा वापर होणार आहे. त्यामुळे स्थानिक आगारातून सुटणाऱ्या कोल्हापूर,
पुणे, कल्याण, नाशिक अशा लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करून शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी १० तर शैक्षणिक सहलीसाठी नऊ गाड्या बाहेर गेल्या आहेत. याचा फटका श्रीरामपूर, शेवगाव, पैठण, बीड, आष्टी येथून दररोज ये जा करणाऱ्या व्यापारी व नोकरदार,
लग्नसराईत खरेदीसाठी चाललेले ग्राहक, अमावस्या निमित्त मढी, मोहटादेवी, वृद्धेश्वर, मायंबा, हनुमान टाकळी येथे राज्यभरातून येणारे भाविक आदींची मोठी गैरसोय झाली. अनेक बसेसच्या फेऱ्या ऐनवेळी रद्द झाल्याने भाविकांना मनस्ताप तर झालाच
पण खाजगी वाहतूकदारांना वाढीव पैसे देण्याची वेळ आली तो विषय तर वेगळाच. दरम्यान शनिवारपासून सर्व सेवा सुरळीत होऊ शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे.