Ahmednagar News : प्रशासनाच्या वेळकाढू पणामुळे आतापर्यंत नगर-कोपरगाव महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ तसेच अपघातात मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ नगर-मनमाड महामार्गावर
सूतगिरणीजवळ रविवार दि. ३ डिसेंम्बर २०२३ रोजी प्रशासनाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने केली आहे.
याबाबत पत्रकात देवेंद्र लांबे यांनी म्हटले, की नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर-कोपरगाव ( एन एच १६०) या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर सुरु व्हावे, यासाठी ऑक्टोबर २०१९ पासून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने वेळोवेळी अनेक आंदोलने करून प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्र आला आहे.
मागील वर्षी ३ डिसेंम्बर २०२२ रोजी याच रोडवर अपघातात निधन पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली म्हणून तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून नगर मनमाड रोडवर सूतगिरण, जोगेश्वरी फाटा येथे दशक्रिया विधी घालण्यात आला होता.
३ डिसेंबर २०२३ रोजी या आंदोलनाला तब्बल १ वर्ष पूर्ण होत असून प्रशासनाकडून अजून या रोडचा कामाला सुरुवात केलेली दिसत नाही. एकेरी वाहतूक, रोडवर पडलेली खड्डे यामुळे रोज अपघात होऊन अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत;
परंतु प्रशासनाने अजूनपर्यंत या रोडच्या कामाला सुरुवात न केल्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ तसेच अपघातात मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ नगर- मनमाड रोड, सूतगिरणी जवळ रविवार दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासनाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.