मराठा समाज अजूनही शांत आहे. या समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर हा समाज प्रचंड आक्रमक होईल. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, यासाठी आतापर्यंत या समाजातल्या अनेकांच्या प्राणांची आहुती गेली आहे.
अनेक आंदोलने या मागणीसाठी करण्यात आली. मात्र सरकारला अद्यापही जाग यायला तयार नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागणार आहे. अन्यथा त्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेटे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, यासाठी नगरमध्ये मंगळवार (दि. १३ रोजी ) शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या शांतता रॅलीप्रसंगी शेटे पाटील हे बोलत होते.
ते म्हणाले या सरकारनं मराठा समाजाचा अंत पाहू नये. आज लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. आज जरी तो शांततेत असला तरी कधीही मराठा समाजातील तरुण रुद्रावतार धारण करु शकतात. सरकारनं मराठा समाजाचा अंत पाहू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील.