Maratha Reservation : मराठा तरुण बाइक रॅली काढून करणार बंदचे आवाहन

Published on -

Maratha Reservation : मराठा नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा तसेच सरकारच्या निषेधार्थ नगर शहरातून मोटारसायकल रॅली काढून मराठा बांधवांच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्याकडून देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा येथून सकाळी दहा वाजता रॅलीला प्रारंभ होणार आहे. तेथून ही रॅली शहरातील बाजारपेठेसह सावेडी उपनगरातून जाणार असून, दुकानदारांना हात जोडून व एक फूल देऊन बंद पाळण्याचे आवाहन केले जाणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे १० फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत असून, सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही.

त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

यासंदर्भात अहमदनगर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी दहा वाजता मराठा तरुण शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन करणार आहेत.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने लढा उभा केला आहे. अन्य समाज बांधवांनी बंद पाळून आंदोलनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe