शेतकरी बांधवांचे हक्क आणि परवडणाऱ्या आरोग्यासाठी जनजागृती करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता खासदार मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
५ किमी आणि १० किलोमीटर अंतराच्या या मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नोंदणी बंधनकारक आहे. तर २.५ किमी वॉकाथॉनसाठी कोणतीही नोंदणी आवष्यक नसल्याचे सांगण्यात आले. नगर-कल्याण महामार्गावरील द्वारका लॉन्स येथून मॅरॅथॉनला प्रारंभ होणार असून केडगांव बायपास मार्गे पुन्हा द्वारका लॉन्स येथे मॅरॅथॉनची सांगता होईल.
५ किमी आणि १० किमीच्या या स्पर्धेत १२ वर्षावरील पुरूष आणि महिला सहभागी होऊ शकतात. याशिवाय महिला व १२ वर्षांखालील मुले आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी २.५ किमी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरक्षा आणि सुविधा
नोंदणीकृत स्पर्धकांना टी शर्ट, कॅप, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेची नोंदणी दि. २ मार्च पर्यंत खुली राहणार आहे. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना सर्व आवष्यक वैद्यकीय सुविधा, रूग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्था यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. समारोपानंतर सर्व सहभागी स्पर्धकांसाठी नास्त्याची सोय करण्यात आली आहे.
शेतकरी आणि रूग्णांसाठी संघर्ष
खासदार नीलेश लंके शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या आरोग्यसेवांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेते. संसदेपासून रस्त्यापर्यंत त्यांनी शेतमालाच्या हमीभावासाठी ते सतत संघर्ष करत आहेत. आरोग्य योजनांमध्ये आर्थिक मदतीची मर्यादा वाढविण्यासाठी तसेच गरीब व गरजू रूग्णांना मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
प्रतिष्ठानची आरोग्य सेवा
नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, मोफत डोळे तपासणी, चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्तन कर्करोग यांसारखे उपक्रम सातत्याने राबविले जातात. रूग्णालय शुल्कात सवलत मिळवून देणे, डॉक्टरांशी थेट चर्चा करून गरीब रूग्णांना मदत करणे तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीतून गरजू रूग्णांना मदत मिळवून देण्याचे कार्यही खा. लंके यांच्या मार्फत करण्यात येते.
सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा
मॅरेथॉन स्पर्धेबरोबरच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्य नागरीकांसाठी दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सेवांसाठी ही चळवळ आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील नागरीकांनी या सामाजिक उपक्रमात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.