Ahmednagar News : शहरातील दोन युवतींची भरचौकात छेड काढणाऱ्या माथेफिरू व तथाकथित मनोरुग्णाविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज (दि.१) रोजी सकल हिंदू समाज शेवगाव यांच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शेवगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एका तथाकथित मनोरुग्ण माथेफिरू नशेच्या धुंदीत महिला व युवतींची छेड काढणे, लज्जास्पद वर्तन करणे, नागरिकांवर जीवघेणे हल्ले करणे, असे प्रकार वारंवार करीत आहेत. रविवारी (दि. ३१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या माथेफिरूने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन महाविद्यालयीन युवतींचा विनयभंग केला,
ही घटना काही सकल हिंदू समाजाच्या तरुणांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्यास यथेच्छ चोप देऊन पोलिसांच्या हवाली करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, सदरचा माथेफिरू मनोरुग्ण असून त्याच्यावर कारवाई करण्यात अडचण असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.
त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी आज सोमवारी (दि.१) शेवगाव बंदचे आवाहन करून पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. मागील महिन्यातही या माथेफिरूने शहरातील दंतरोग तज्ज्ञ पुरुषोत्तम बिहाणी यांच्यावर त्यांच्या राहत्या निवासस्थानी जाऊन चाकूने वार केला होता,
त्यावेळीही पोलिसांनी या घटनेची दाखल घेतली नव्हती. त्यामुळे रविवारी झालेल्या घटनेनंतर सकल हिंदू समाज, शेवगाव आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. या वेळी शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे,
युवा सेनेचे जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट, डॉ. निरज लांडे, नवनाथ कवडे, मनोज (गुरु) कांबळे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या घटनेतील आरोपीस न्यायालयासमोर हजर करून त्याची जिल्हा रुग्णालयामार्फत तपासणी झाल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.