Ahmednagar Breaking : भाकरीची सोय व्हावी म्हणून लग्न केलं, नवरीने दुसऱ्याच दिवशी पतीच्या चहात औषध टाकलं..दागिने घेऊन पसार झाली

Published on -

समाजात सध्या अनेक धक्कादायक घटनांची मालिकाच पाहायला मिळत आहे. फसवणूक, चोरी आदी गोष्टी तर नित्याच्याच झाल्यात का? असा सवाल आता पडायला लागला आहे. महिलाही आता इतके निष्ठुर कशा झाल्यात असा प्रश्न पडावा अशी एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.

नुकतंच लग्न पार पडलं व त्या नवीन नवरीने दुसऱ्याच दिवशी पतीच्या चहात गुंगीचे औषध टाकून दागिने व पैसे घेऊन पळून गेल्याची घटना राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (१४ डिसेंबर) घडली असून या नववधूसह मध्यस्ती करणाऱ्या तिघांवर राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.

नेमके काय घडले ?

कानिफनाथ श्रीरंग थोरात (वय ५०) हे धामोरी खुर्द येथे आपल्या मुलांसह राहतात. काही आजारपणामुळे २०१८ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. घरात महिला न राहिल्याने खाण्यापिण्याचे हाल व्हायला लागले.

तेव्हा कानिफनाथ यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान त्यांना वांबोरीमधील तिघांनी मुलगी दाखवली. लग्न जमवण्यास दोन लाख रुपये रोख घेतले. १३ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता कानिफनाथ थोरात व मुलीचा विवाह त्यांनी लावून दिला. तिला तेथे त्यांनी दागिनेही घातले. लग्नानंतर ते धामोरी खुर्द येथे घरी आले.

दुसऱ्याच दिवशी चहातून पाजले औषध

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबरला नववधुने आपले रंग दाखवले. तिने सायंकाळ्च्या वेळी घर कुणी नसताना कानिफनाथ थोरात यांना चहा करून दिला. त्यात तिने गुंगीचे औषध टाकले होते.

चहा पिताच कानिफनाथ थोरात यांना गुंगी आली. काही वेळातच त्यांचा मुलगा घरी आला. त्याने कानिफनाथ थोरात यांना झोपेतून उठवले. घरात नववधू दिसली नाही. त्यांची नवविवाहित पत्नी घरातून गायब झाल्याचे आढळले.

अंगावरील दागिने घेऊन पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. लग्नासाठी मध्यस्थी असणारे तिघे व ती महिला यांनी संगनमताने २ लाख १७ हजार ५७० रुपयांची फसवणूक केल्याचे कानिफनाथ थोरात यांनी तक्रारीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe