२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने साडीने गळा आवळून प्रेयसीला जिवंत ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार केडगाव मधून समोर आला आहे.ही घटना सोमवारी (दि. २४) रात्री साडेदहा वाजेदरम्यान केडगाव परिसरातील मोहिनीनगर भागात घडली.संगीता नितीन जाधव (वय ३५, रा. पारगाव खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा, हल्ली रा. केडगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी आरोपीला कर्जत मधून त्याच्या राहत्या घरातून कोतवाली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली.सारस दत्तू सुरवसे (वय २९, रा. माळीगल्ली, ता. कर्जत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मयताची बहीण संगीता सचिन जाधव (रा. मोहिनीनगर, केडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या पतीसह केडगाव येथे राहत असून, एका हॉटेलमध्ये काम करतात.त्यांच्या बहिणीचे १८ वर्षापूर्वी कर्जत येथील नितीन फुलचंद जाधव यांच्याशी विवाह झाला होता.ते सारस सुरवसे याच्याकडे बिगारीचे काम करत होते.त्यामुळे सुरवसे त्यांच्या घरी येत असे. यातून संगीताची सुरवसे याच्याशी ओळख झाली.
ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.पती दारू पिऊन त्रास देत असल्याने संगीता दोन मुलांसह मागील चार वर्षापासून सुरवसे याच्या सोबत पानमळा (ता. खेड, जि. पुणे) येथे राहत होती.२ फेब्रुवारी रोजी आई भामाबाई या संगीताकडे खेडला आल्या होत्या.तेंव्हा सुरवसे हा चारित्र्यावर संशय घेऊन सांगिताला त्रास देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ही बाब त्यांनी फोन करून केडगाव येथील मुलीला म्हणजे संगीताच्या बहिणीला सांगितली. सुरवसेला इथे कामधंदा नसल्याने त्यांना अहिल्यानगरला घेऊन येते असे आईने फोनवरून फिर्यादीला सांगितले होते.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संगीता, दोन मुले आणि सुरवसे हे केडगाव येथे राहण्यास आले. सुरवसेला मजुरीचे कामही मिळाले. तो कामधंदा करत होता. दोघे फिर्यादीच्या घरी राहत होते.
सुरवसे नेहमी प्रमाणे सोमवारी (दि. २४) सकाळी नऊ वाजता कामावर निघून गेला आणि सायंकाळी सहा वाजता घरी आला. सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर सुरवसे व संगीता हे दोघे झोपण्यासाठी खोलीत गेले.रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रुममधून ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने फिर्यादीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.मात्र सुरवसे याने बराचवेळ दरवाजा उघडला नाही.
फिर्यादीने जोरजोराने धक्के दिल्याने सुरवसे याने दरवाजा उघडला.दरवाजा उघडला त्यावेळी सुरवसे याने घराच्या लोखंडी अँगलला साडी बांधून संगीतानेच गळफास घेतला असा बनाव रचत होता. तर दुसरीकडे संगीता फरशीवर पडलेली दिसली. म्हणून फिर्यादीला संशय आला. त्यांनी माझ्या बहिणीला काय केले, अशी विचारणा केली असता त्यांच्या मांडीवर लाथ मारून सुरवसे घरातून पळून गेला. त्यानंतर संगीता हिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आत्महत्येचा केला बनाव सुरवसे याने संगीताचा साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः अँगलला साडी बांधून संगीताने स्वतःच गळफास बांधून आत्महत्या केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.मात्र मयताच्या बहिणीच्या लक्षात आल्याने तो पसार झाला.