विवाहित महिला खेळणी घ्यायला गेली अन् गायबच झाली! ‘लव जिहाद’च्या चर्चेने पेटलं गाव…

Published on -

नगर जिल्ह्यातील देहरे (ता. नगर) येथे ३० वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली होती. शुक्रवारी संध्याकाळी आपल्या मुलासाठी जत्रेमधून खेळणी घेण्यासाठी बाहेर पडलेली ही महिला परत न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

लव जिहादच्या चर्चेमुळे वातावरण तणावग्रस्त

महिलेच्या बेपत्ततेनंतर गावात ती एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तींसोबत दिसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काही लोकांनी तिला आणि त्या व्यक्तींना जवळच्या गावातील हॉटेलमध्ये मुक्काम करताना पाहिल्याचा दावा केला. त्यामुळे हा लव जिहादचा प्रकार असल्याचे बोलले जाऊ लागले आणि गावात वातावरण तापले. संतप्त ग्रामस्थांनी रविवारी आंदोलन छेडले.

ग्रामसभेत घेतले ठराव

या घटनेनंतर गावात तातडीने ग्रामसभा बोलावण्यात आली. यामध्ये गावातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच विशिष्ट समाजाच्या काही व्यक्तींची संख्येत वाढ झाल्याने त्यांचे मूळ ठिकाण, आधार कार्ड आणि अन्य ओळखपत्रे तपासण्याची मागणी करण्यात आली. तसेच बाहेरून आलेल्या लोकांना गावाबाहेर काढण्याचा ठरावही संमत करण्यात आला.

आमदार संग्राम जगताप यांची भेट

गावात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी गावाला भेट दिली. त्यांनी बेपत्ता महिलेच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली तसेच गावातील अतिक्रमणे हटवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

महिला अखेर अकोल्यात सापडली

दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अकोले पोलिसांच्या मदतीने बेपत्ता महिलेचा शोध घेत तिला अकोले येथून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी महिलेला पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, जर तिने तक्रार दिली तर गुन्हा दाखल केला जाईल, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe