Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगा पत्रकार असल्याचे खोटी बतावणी केली. त्यानंतर आम्ही देखील अल्पवयीन विवाह केला आहे काही होत नाही असे सांगत अल्पवयीन मुलीशी विवाह करून दिला.
त्यानंतर काही दिवसांतच त्याचे पाशवी रूप बाहेर आले. तो व घरचे तिला शारीरिक, मानसिक त्रास देऊ लागले. गर्भधारणा झाल्यानंतर तिच्या सासरकडील मंडळींनी तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. राजूर पोलिस ठाण्यात याबाबत शुक्रवारी (दि. २६) गुन्हा दाखल झालाय.
अधिक माहिती अशी : १२ मे २०२३ ला तिचा विवाह झाला. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण नसल्याने तिची आई विवाहाला नकार देत होती. परंतु मुलाच्या वडिलांनी आम्ही सोळा वर्षांच्या मुलीचे लग्न लावून दिले आहे, असे सांगितले.
लग्नानंतर काही दिवसांनी तिला पतीचे विवाहबाह्य संबंध माहीत झाल्यानंतर तिने त्याच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता तिची अधिक छळवणूक करण्यात आली. सासू, सासरा, दीर, आतेसासू या सर्वांनी क्षुल्लक कारणावरून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
विवाहानंतर तीन महिन्यांनी संगमनेर येथे वकिलाच्या मार्फत तिच्या माहेर आणि सासरच्या लोकांमध्ये बैठक झाली. त्यानंतर येथून पुढे कोणतीही मारहाण, शारीरिक छळ करणार नसल्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात आले होते.
गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्या नाही म्हणून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण
मुलगी सासरी नांदण्यास गेल्यानंतर तिला शिवीगाळ व्हायला लागली. तिचा नवरा रात्री उशिरापर्यंत बाहेर राहून इतर मुलींबरोबर बोलतो. सासू, सासरा, दीर हे अश्लील भाषा वापरतात. दीर वाईट नजरेने पाहतो. मुलीला दिवस गेले हे समजल्यानंतर सासरकडील मंडळीनी प्रॉपर्टीला वारस नको म्हणून गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.
तिने गोळ्या खाण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण केल्याने ती बेशुद्ध झाली. दरम्यान, मुलीच्या माहेरकडील मंडळींना शिवीगाळ करत मुलीला घेऊन जा असे सांगण्यात आले. तिला तिचे आई, भाऊ बघण्यासाठी आले असता मुलगी किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली होती. मुलीच्या सासरकडील मंडळींनी तिच्या आई आणि भावालादेखील मारहाण केली असल्याचे म्हटले जात आहे.