१४ जानेवारी २०२५ मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील ग्रामपंचायत मालकीचा गटक्रमांक ३४४ या ७५ हेक्टर गायरानावरील जंगलाला लागलेल्या आगीत तब्बल २२ हेक्टरवरील विविध जातीची हजारो झाडे जळून खाक झाली. ही घटना शुक्रवार (दि.१०) रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे.
या आगीत करंज, हातगा, शिसु, चिंच, काशीद, बांबू, सीताफळ, भिंडी, निवडुंग, कडुनिंब, शिरस, शिसम, आवळा अशा विविध जातीची सुमारे २५ हजार झाडे जळाली आहेत.यामध्ये काही मोठ्या झाडांचेही आगीमुळे नुकसान झाले आहे.आगीत अनेक छोट वन्यजीव मृत पावले आहेत.या आगीमुळे शासकीय मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या गायरानातील जंगलाला आग लागण्याची दोन वर्षातील ही चौथी घटना आहे.मागील वर्षी आग लागली होती.त्यानंतर पुन्हा ही आग लागल्याने ही आग नेमकी कशामुळे लागली,का कोणी लावली ? याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
हे सर्व घडले असताना मात्र यामध्ये शासकीय मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत मिरजगाव ग्राम पंचायतीने पोलिसांत अज्ञात इसमा विरोधात तक्रार केली आहे.जंगलाला लागलेली आग विझविण्याकरिता आसपासचे शेतकरी, टायगर अॅकॅडमीचे विद्यार्थी तसेच ग्राम पंचायत कर्मचारी दत्ता तुपे, बापू घोडके, अशोक नवले, बाळू गाडेकर आदींनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असता,आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले.
आग विझविण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच सुमारे ७५ हेक्टर पैकी २२ हेक्टर जंगल क्षणार्धातच जळून खाक झाले.गायरान जंगलाला आग लागली असता, सामाजिक वनीकरण विभागाचा कोणीही कर्मचारी याठिकाणी फिरकला नाहीत.
मिरजगाव ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण यांनी ग्रामपंचायत मालकीच्या गटक्रमांक ३४४ या ७५ हेक्टर क्षेत्रात अनेक वर्षांपासून विविध जातीच्या लाखो वृक्षांची लागवड केली आहे.तसेच मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभागाने ४३ हजार वृक्षलागवड केली होती.
या जंगलात नेहमीच आग लागत असल्याने या वृक्षांचे वृक्षसंवर्धन तसेच यामध्ये अनेक छोट्या वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची आहे.आगीमुळे अनेक वृक्ष जळून खाक झाले.त्याचबरोबर वन्यजीवही मृत पावल्याने वन्यजीवप्रेमी व निसर्ग प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.
सामाजिक वनीकरणाचे वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष
एकीकडे राज्य सरकार वृक्ष लागवडीसाठी प्रसार-प्रसिद्धी करीत अनेक योजना राबवत आहे. मात्र, दुसरीकडे सामाजिक वनीकरण विभागाद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करून लावलेल्या झाडांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वृक्षप्रेमी नागरिकांमधून बोलले जात आहे.
मिरजगाव ग्रामपंचायत मालकीच्या पोलिसांत अज्ञात इसमाच्या विरोधात तक्रार दिली आहे.गायरानामधील आग ही कोणी तरी अज्ञात व्यक्तीने खोडसळपणाने लावल्याने पोलिसांनी सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.- सुनीता नितीन खेतमाळस,सरपंच, मिरजगाव