Mauli Gavane Murder : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माउली सतीश गव्हाणे याचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली होती शेतातील विहिरीत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने जलद गतीने तपास करून एका आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
१२ मार्च रोजी विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला. मृताच्या शरीराचे मुंडके, दोन्ही हात आणि उजवा पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने निर्दयपणे हत्या करून मृतदेह पोत्यात भरून टाकल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची गंभीर दखल घेत बेलवंडी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 103, 238 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास अधिक गतीमान करण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जबाबदारी दिली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन विविध संशयास्पद बाबींची तपासणी केली.
सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची नोंद तपासली गेली. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कानातील बाळी आणि शरीरावरील खुणांचा अभ्यास करण्यात आला. या तपासादरम्यान, मृत व्यक्तीचे नाव माऊली सतीश गव्हाणे (वय १९, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) असल्याचे निष्पन्न झाले.
१६ मार्च २०२५ रोजी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार, सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०, रा. दाणेवाडी) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला शोधून काढले आणि ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हा खून का केला याचा सखोल तपास सुरू आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर करीत आहे. या महत्त्वपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी अत्यंत प्रभावीपणे हा गुन्हा उघडकीस आणला.
दाणेवाडी येथील या हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. मात्र, पोलिसांनी जलद आणि नियोजनबद्ध तपास करून अवघ्या काही दिवसांत आरोपीला गजाआड केले. या घटनेच्या पुढील तपासाद्वारे गुन्ह्याच्या अधिक कारणांचा आणि पार्श्वभूमीचा उलगडा होण्याची शक्यता आहे.