Ahmednagar News : आपण माझ्या बळीराजावर व माझ्या मतदारसंघातील जनतेवर कृपादृष्टी ठेवण्याचे मागणे मागावे, अशी प्रार्थना आ. आशुतोष काळे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या संत-महंतांच्या चरणी केली.
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांच्या वतीने मठाधिपती रमेशगिरी महाराज, सद्गुरु रामगिरी महाराज व सद्गुरु परमानंद महाराज यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहेत.
त्यामुळे विविध देवस्थानचे संत-महंत, तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगाचार्य, गायनाचार्य व भजनी मंडळांचा पाद्य पूजनाचा कार्यक्रम व प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचा कार्यक्रम आ. काळे यांच्या हस्ते शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी मतदार संघातील हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी संत- महंतांच्या चरणी प्रार्थना केली. तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून साधू संतांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू संत-महंतांबरोबरच आपले गुरुवर्य रमेशगिरी महाराज व महंत रामगिरी महाराज,
परमानंद महाराज यांना मतदार संघातील साधू-संत व महंतांच्या वतीने विशेष निमंत्रित करण्यात आले, हि आपणा सर्वांसाठी भाग्याची व अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचे पूजन करणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची ५०० वर्षापासूनची प्रतीक्षा २२ जानेवारीला पूर्ण होत आहे.
पवित्र अयोध्येच्या भूमीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जावून श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. हा प्रत्येक श्रीराम भक्तांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. यावेळी विविध देवस्थानचे संत-महंत, तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार,
मृदुंगाचार्य, गायनाचार्य व भजनी मंडळ तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.