अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- राहाता शहरात चिकनगुनिया, मलेरिया, टाइफाईड तसेच विविध साथींच्या आजाराची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
दरम्यान या प्रश्नि नगरपरिषदेने तात्काळ जंतूनाशक फवारणी करून साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
दरम्यान शहरातील या प्रमुख समस्यांबाबत शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखाली सागर लुटे व युवा सेना प्रमुख भागवत लांडगे यांनी प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांना निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेऊन शहरी भागात जंतूनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहाता शहरात चिकनगुनिया, मलेरिया, टायफाईड तसेच इतर साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून
शहरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात जंतूनाशक फवारणी झाली नसल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने जंतूनाशक औषध फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले होते. दरम्यान प्रशासक चव्हाण यांनी जंतूनाशक फवारणी सुरू केल्याने नागरिकांनी प्रशासक चव्हाण यांचे आभार मानले आहेत.