Ahmednagar News : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पण केवळ चर्चेतच राहिलेल्या नगर तालुक्यातील घोसपुरी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव – एमआयडीसीचा विषय पुन्हा एकदा राज्यशासनाच्या अजेंड्यावर आला आहे.
या दोन्ही ठिकाणच्या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची स्थळ पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सुमारे १२ वर्षांपूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्यकाळात नगर तालुक्यातील घोसपुरी हिवरे झरे, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद परिसरात तसेच श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे नव्याने एमआयडीसी स्थापन करण्याचा प्रस्ताव समोर आला होता.
त्यावेळी त्यावर बरीच चर्चाही रंगली होती. गावोगावी बैठकाही झाल्या मात्र पुढे हा विषय प्रलंबित पडला. आता नव्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) त्या प्रस्तावावरील धुळ झटकली आहे.
एमआयडीसीचे महाव्यवस्थापक (भूसंपादन) संदीप आहेर यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले असून, त्यात अहमदनगर जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची स्थळ पाहणी करण्याचे आदेश एमआयडीसीच्या नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी यांना दिले आहेत.
त्यानुसार प्रस्तावित असलेल्या नगर तालुक्यातील घोसपुरी, हिवरे झरे, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद परिसरातील २ हजार २५ हेक्टर आर एवढया क्षेत्राची तर श्रीगोंदा तालुक्यातील चिखली – कोरेगाव परिसरातील १३११. ९२ हेक्टर आर एवढ्या क्षेत्राची स्थळ पाहणी भुनिवड समितीच्या सदस्यांच्या मार्फत दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी केली जाणार आहे.













