समाजाच्या भल्यासाठी वृत्तवाहिन्यांनी नेत्यांची वायफळ वक्तव्य दाखविणे बंद केली पाहिजे, तरच राजकीय नेते असे वादग्रस्त बोलणे बंद करतील. आमच्यावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सुसंस्कृत राजकारणाचे संस्कार आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही बेताल वक्तव्याबाबत सुरू आहे ते अत्यंत चुकीचे आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले
खासदार सुळे यांनी शिर्डीतील साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, पालकमंत्री पद व बदल्यांसाठी दिल्ली वारी करणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारमधील मंर्त्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी दिल्लीची वारी करावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र एवढ्या रकमेने काही होणार नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली तरच शेतकरी जगू शकेल.
मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम अशा समाजाला आरक्षण मिळावी ही मागणी मी करत आली आहे. येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात यावर बिल आणावे, अशी मागणी देखील लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त महेंद्र शेळके, राष्ट्रवादीचे संदीप वर्षे यांच्यासह संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांचा संस्थानचे वतीने प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांनी सत्कार केला. यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी शरद पवारांची :- काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्वांना माहित आहे की, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे. राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब आणि पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी अशा शब्दात खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी कुणाची या प्रश्नावर उत्तर दिले.