२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातून अज्ञात व्यक्तीने मजुरी काम करणाऱ्या महिलेच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) ३.४५ दुपारी च्या सुमारास घडली.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी या मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातील असून मजुरी कामासाठी अहिल्यानगर शहरात रेल्वेस्टेशन परिसरात राहतात.
मंगळवारी त्यांना श्रीगोंदा येथे मजुरी कामासाठी जायचे असल्याने त्या त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत रेल्वेस्टेशन येथून रिक्षाने माळीवाडा बस स्थानक परिसरात आल्या.तेथे श्रीगोंदा येथे जाणाऱ्या बसचा शोध घेत असताना अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले.
दरम्यान, फिर्यादी यांनी मुलीचा परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.