Ahmednagar News : अंतरिम अर्थसंकल्पवरील चर्चेमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन योजनेचे आमदार लहू कानडे यांनी काल गुरूवारी (दि.२९) पुन्हा एकदा वाभाडे काढले. या योजनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी आ. कानडे म्हणाले, अर्थमंत्री यांनी आपल्या भाषणात हर घर नल, हर घर जल या संकल्पनेनुसार ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी एक कोटी ४६ लाख ६४ हजार ३८२ नळ जोडण्या जोडण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते.
जानेवारी २०२४ पर्यंत त्यापैकी एक कोटी २२ लाख दहा हजार ४७५ घरगुती नळ जोडण्या दिल्या आहेत, असा उल्लेख केला आहे.
आपण अनेकदा जलजीवन मिशनच्या कामाबाबत, त्याच्या उद्दिष्टांबाबत व उणीवांबाबत बोललो आहे. ही आकडेवारी अत्यंत चुकीची व अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून देणारी आहे. माझ्या श्रीरामपूर मतदारसंघातील २५ ठिकाणच्या ग्रामपंचायतीकडून अशा स्वरूपाचे ठराव करून घेतले आहे की,
आम्ही या योजनेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घराला नळाचे कनेक्शन दिलेले आहे. सरपंच व ग्रामसेवकाची सही घेऊन असे प्रमाणपत्र घेतले.
त्यानंतर ती योजना राबविणाऱ्या उपअभियंताचे दुसरे पत्र घेण्यात आले की, ग्रामपंचायतीने प्रमाणपत्र दिले त्यानुसार आम्ही योजनांची पाहणी केली व याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ दिलेला आहे.
जिथे अशा स्वरूपाची प्रमाणपत्रे देण्यात आली. त्या गावांमध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत नळ दिलेले आहेत. ते देखील जून्या योजनांचे आहेत. अजून या योजनांची कामेच पूर्ण झालेली नाहीत. वितरिका नाहीत. तरीही घराघरांमध्ये नळ दिल्याचे प्रमाणपत्र वरच्या सांगण्यावरून खालच्या सरपंच व ग्रामसेवकांकडून घेतली.
अधिकाऱ्यांनाही अशीच सक्ती करून त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेतली आणि आता श्रीरामपूर तालुक्यात १०० टक्के घरांमध्ये पाणी दिल्याची प्रमाणपत्र पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत.
त्याचा आधार घेऊन या योजनेची कोट्यावधी रुपयांची बिले ठेकेदार व अधिकाऱ्यांनी काढून घेतले आहेत. याबाबतची कागदपत्रे व प्रमाणपत्रे आपण सरकारकडे देत असून याबाबतची चौकशी करावी आणि अशी प्रमाणपत्रे दिलेली असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आ. कानडे यांनी विधानसभेत केली.