Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. मुंडे कन्सट्रक्शन, शेवगाव या ठेकेदारास काम मिळाले आहे. फक्त तांत्रीक बाबीमुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळाला नाही.
ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यावर प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण होऊन ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळताच रस्त्याच्या कामाला सुरवात होईल.
मात्र, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक ज्या रस्त्याचे काम मंजुर झाले आहे, त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून काम आम्हीच काम मंजुर केले, असल्याची जनतेची दिशाभुल करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
मात्र, तालुक्यातील जनता सुज्ञ असून, काम करणारे कोण व राजकारण करणारे कोण, हे जनतेला माहीत आहे. विरोधकांच्या षडयंत्राला तालुक्यातील जनता कदापी बळी पडणार नाही, याची मला खात्री आहे, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
तालुक्यातील टाकळीमानुर ते करोडी रस्ता मंजुर करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने करोडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यास आमदार राजळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर देऊन आंदोलनाची हवा काढुन घेतली.
प्रसिद्धीस पत्रकात आ. राजळे यांनी म्हटले आहे की, विरोधकांचे आंदोलन हास्यास्पद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या आडीच वर्षांच्या काळात तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या रस्त्यासह मतदारसंघातील इतर रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सामावेश करावा, यासाठी अनेक वेळा मागणी व पाठपुरावा केला.
मात्र त्यांनी एकाही रस्त्यासाठी निधी मंजुर केला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला असता त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन मधून ह्या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली असून, ग्रामविकास विभागाकडून दि. ८ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळालेली आहे.
ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पुर्ण होऊन मुंडे कन्सट्रक्शन शेवगाव, या ठेकेदाराला ह्या रस्त्याचे काम मिळाले आहे. मात्र काही तांत्रीक करणामुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश होण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.
संबंधित ठेकेदाराकडून कागदापत्रांची पूर्तता होताच ठेकेदार प्रत्यक्ष कामास सुरुवात करतील. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे विरोधक राजकीय स्वार्थासाठी मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भांडवल करून उपोषण रस्ता रोको आंदोलन करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना आता आंदोलन करणारे विरोधक त्यावेळी सत्तेत होते, त्यावेळी त्यांना तालुक्यातील विकासकामासाठी एक रुपयांचा निधी आणता आला नाही, असे राजळे यांनी पत्रकात म्हटले आहे.