लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, स्वतंत्र आरटीओ कार्यालय आणि एसटी बसेसच्या थांब्यांबाबत चर्चा झाली.
संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, सरकारने सकारात्मक निर्णय घेत जागा उपलब्ध करून दिली. मात्र, हे स्मारक अधिक भव्यदिव्य ठरावे यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

त्याचसोबत, संगमनेर आणि अकोले तालुक्यांसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावे, ही नागरिकांची आणि स्थानिक प्रशासनाची प्रदीर्घ मागणी आहे. या पूर्वी मागणीसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे स्वतंत्र आरटीओ कार्यालय न देता ‘कॅम्प ऑफिस’ मंजूर केले.
मात्र, ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे कॅम्प ऑफिस लवकरात लवकर सुरू करावे आणि सर्व तांत्रिक अडचणी दूर करून स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करावे, अशी ठोस मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी या बैठकीत केली.
सध्या रात्रीच्या वेळी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस संगमनेर शहरातील मुख्य बसस्थानकात थांबत नाहीत, त्यामुळे नागरिकांना महामार्गावर उतरावे लागते. शासनाने यापूर्वीच रात्री 9 वाजेनंतर सर्व बसेस संगमनेर बसस्थानकात थांबाव्यात, असा आदेश दिला आहे. मात्र, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तातडीने या आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी आ. तांबेंनी केली.
या सर्व मुद्द्यांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. संगमनेरच्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि शहराच्या विकासासाठी या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले.