शाळेच्या पहिल्याच दिवशी आमदार चिमुकल्यांची घेणार भेट, आनंददायी शिक्षणासाठी सरकारचा नवा प्रयत्न

Published on -

अहिल्यानगर: नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस चिमुकल्यांसाठी खास असणार आहे. शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ हा उपक्रम जाहीर केला असून, यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी आमदार स्वतः शाळेत जाऊन मुलांचं स्वागत करणार आहेत. “गुडमॉर्निंग” म्हणत त्यांच्यासोबत हा आनंदाचा क्षण साजरा करणार आहेत.

शाळेचा पहिला दिवस, विशेषतः पहिलीत प्रवेश करणाऱ्या मुलांसाठी थोडा गोंधळाचा असतो. नवीन वातावरण, नवीन चेहरे यामुळे त्यांना अस्वस्थ वाटतं. हा दिवस त्यांच्यासाठी आनंददायी व्हावा, म्हणून शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

यंदा सरकारने एक पाऊल पुढे टाकत ‘१०० शाळांना भेटी’ हा उपक्रम आणला आहे. या अंतर्गत पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार आपापल्या मतदारसंघातल्या जवळच्या शाळेत जाऊन मुलांना भेटतील आणि त्यांचं स्वागत करतील.

हा उपक्रम फक्त स्वागतापुरता मर्यादित नाही. यात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यासह जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्षभरात १०० शाळांना भेट द्यायची आहे.

या भेटीत गावकऱ्यांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे. शाळेत काही समस्या दिसल्या, जसं की धोकादायक इमारती, पाणी नसल्याने बंद शौचालयं किंवा अस्वच्छता, तर त्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या जातील. यामुळे शाळांमधल्या अनेक अडचणी लगेच सुटण्याची शक्यता आहे.

हा उपक्रम शालेय शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सुरू झाला आहे. शाळांची स्थिती समजून घेणं, आवश्यक सुधारणा करणं आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार आपापल्या मतदारसंघातल्या शाळांना भेट देऊन मुलांचं वैयक्तिक स्वागत करतील. या भेटीत ते शाळेचं कामकाज, शिक्षणाचा दर्जा आणि सोयी-सुविधांचा आढावा घेतील.

याशिवाय, ग्रामीण भागातल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश मिळावा, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्याशी चर्चा होणार आहे.

शाळेची इमारत, खेळाच्या सुविधा, शालेय पोषण आहार यांचाही बारकाईने आढावा घेतला जाईल. हा उपक्रम मुलांचं शिक्षण आनंददायी आणि सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त होतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe