मोकाट जनावरांमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा; पालिकेचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शहर व उपनगरांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत.

मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने एकविरा चौकात मोकाट जनावरे मोठ्या संख्येने रस्त्यावर उभी रहात असल्याने वाहतुकीला अडथळे येत आहे.

शहरातील नगर-मनमाड, औरंगाबाद-नगर-पुणे, अशा महामार्गांसह नालेगाव, नेप्ती चौक, चितळे रोड, दिल्लीगेट, सर्जेपुरा अशा मध्यवर्ती शहरातील विविध भागांसह सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक,

पाइपलाइन रोड, तारकपूर, अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत. पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौक या रस्त्यावर तर कायम मोकाट जनावरे दिसतात.

या रस्त्यावर जिल्हा रुग्णालयासह एक महाविद्यालय आहे. तसेच सावेडी उपनगरातून दिल्लीगेट परिसरात जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे.

त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते; मात्र, या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो.

त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. याभागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe