अहिल्यानगर: श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीत श्री साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय श्री रामनवमी उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून ५० हजारांहून अधिक पदयात्री आणि शंभराहून अधिक पालख्या शिर्डीत दाखल झाल्या. ”तुला खांद्यावर घेईन, पालखीत मिरवीन” या भक्तिभावपूर्ण साई पालखी भजनाने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने पालख्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले.
श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत, ११४ वर्षांची परंपरा असलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या पूर्वसंध्येला, राज्यभरातील कानाकोपऱ्यातून नोंदणीकृत ९६ पालख्या तसेच परिसरातील विनानोंदणीकृत अनेक पालख्या दाखल झाल्या आहेत. श्रीरामनवमी उत्सवासाठी आलेल्या सर्व पालख्यांचे स्वागत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी
अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्येही शेकडो किलोमीटरचा प्रवास अनवाणी पायाने करत, खांद्यावर साईबाबांची पालखी घेऊन येणारे पदयात्री, बाबांचे नामस्मरण करत शिर्डीत येतात. त्यांच्या या भक्तीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण होते. या पदयात्रींचे आणि पालख्यांचे स्वागत साई संस्थान प्रशासन व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येते. ही परंपरा आजही उत्साहाने सुरू आहे.
मागील वर्षापासून, रामनवमी उत्सवात पालख्यांचे स्वागत व पदयात्रींचा यथोचित सत्कार विधीवत पूजाअर्चा करून करण्या त येत असल्याने, हजारो पदयात्रींच्या चेहऱ्यावर समाधान व प्रसन्नता दिसून येत आहे. रामनवमी उत्सव हा साई संस्थानच्या प्रमुख आणि महत्त्वपूर्ण उत्सवांपैकी एक असून, तो दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मुंबई, गुजरातसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दोनशेहून अधिक पालख्यांमुळे संपूर्ण साईनगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेली आहे.