Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात आणि जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांचं जाळं पसरलं आहे. शहरातच शंभरहून अधिक कत्तलखाने सक्रिय आहेत. पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत कारवाईचा फास आवळल्यानं उघडपणे चालणारी ही कत्तलखानं आता घरात, अगदी दुसऱ्या मजल्यावर लपून-छपून सुरू झाली आहेत. इतकंच नाही, तर गोमांसाची होम डिलिव्हरी दुचाकीवरून होत आहे, आणि काही ठराविक भागात बेकरी, किराणा दुकानातून एक-दोन किलोच्या पार्सलमधून त्याची विक्री होत आहे. या अवैध धंद्यामुळे शहरात अॅनिमल वेस्टची गंभीर समस्या निर्माण झाली असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
अवैध कत्तलखान्यांचं नवं स्वरूप
अहिल्यानगरात हमालवाडा, झेंडीगेट, मुकुंदनगर आणि खेळीमेट यासारख्या भागात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट आहे. यात प्रामुख्याने गोवंश जनावरांची कत्तल केली जाते. पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत तीव्र कारवाई करत १ लाख १० हजार किलो गोमांस जप्त केलं आणि २,००८ गोवंश जनावरांची सुटका केली. पण या कारवाईमुळे कत्तलखान्यांचा धंदा बंद झाला नाही, तर त्यांनी आपला मार्ग बदलला. आता घरात किंवा दुसऱ्या मजल्यावर लपून-छपून कत्तल सुरू आहे. गोमांसाची विक्री आता २०० रुपये प्रतिकिलो दराने होत असून, कारवाईमुळे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. काही दुकानांमधूनही लपून-छपून किरकोळ विक्री सुरू आहे.

होम डिलिव्हरी आणि आलिशान गाड्यांचा वापर
पोलिस आणि गोरक्षकांच्या कारवाईमुळे उघडपणे गोमांस विक्री आणि जनावरांची वाहतूक करणं कठीण झालं आहे. त्यामुळे आता कत्तलखानांचे कारनामे नव्या पद्धतीने सुरू आहेत. गोमांस एक-दोन किलोच्या पार्सलमध्ये पॅक करून दुचाकीवरून होम डिलिव्हरी केली जात आहे. इतकंच नाही, तर पोलिस आणि गोरक्षकांची दिशाभूल करण्यासाठी होंडा सिटी, स्विफ्टसारख्या आलिशान गाड्यांमधून जनावरं आणि गोमांसाची वाहतूक होत आहे. यासाठी बीड, कल्याण, पुणे यासारख्या बाजारांमधून तसंच शेतकऱ्यांकडून जनावरं खरेदी केली जातात. आधी ८ ते १२ हजारात मिळणारी जनावरं आता ५ ते ७ हजारात खरेदी होत आहेत. यासाठी काही एजंटही सक्रिय झाले आहेत.
अॅनिमल वेस्टची गंभीर समस्या
अवैध कत्तलखान्यांमुळे शहरात अॅनिमल वेस्टची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कत्तलखान्यांमधून निघणारं टाकाऊ मांस, हाडं आणि इतर कचरा रात्रीच्या वेळी शहरातील मोकळ्या जागी, गटारांमध्ये आणि ओढ्यां-नाल्यांमध्ये टाकला जातो. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रस्त्याच्या कडेला आणि कोठला परिसरात यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे, आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पोलिसांनी कारवाई तीव्र केली असली, तरी हा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही.
कातडीच्या व्यापारात कोट्यवधींची उलाढाल
कत्तलखान्यांमधून जनावरांचं मांसच नाही, तर त्यांच्या कातडीचाही मोठा व्यापार सुरू आहे. सुरुवातीला ही कातडी मुंबईतील व्यावसायिकांना पुरवली जात होती, पण आता कानपूर येथील काही कंपन्यांना त्याची विक्री होत आहे. स्थानिक एजंट या कंपन्यांशी संपर्क साधून कातडीचा पुरवठा करतात, आणि यातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. पोलिसांनी गोवंश संरक्षणासाठी आणि अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी अधिक कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.