अहिल्यानगर : भारतातील हवामान व नैसर्गिक अनुकुलतेमुळे भारतीय फळे व भाज्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारताच्या फळांना असलेल्या अविट गोडीमुळेच आज जगभरातील तब्बल ८५ देश भारतातील ताज्या फळांची चव चाखत आहेत. यात महाराष्ट्रातील डाळिंबाचा देखील मोठा वाटा आहे. देशातल्या फळ निर्यातीमध्ये गेल्या ५ वर्षांत प्रचंड वाढ झाल्यानंतर, सरकार नवीन बाजारपेठा शोधत आहे.
संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे या देशांना होणाऱ्या फळांच्या निर्यातीमध्ये अनुक्रमे २७ टक्के आणि ६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत भारताच्या फळ निर्यातीत ४७.५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जतिन प्रसाद यांनी सांगितले.

या निर्यातीला चालना देण्यासाठी शितसाखळी पायाभूत सुविधा विकसित करताना सरकार गुणवत्ता हमीवर आणि नवीन बाजारपेठांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. देशाबाहेर जाणारे कोणतेही उत्पादन ‘ब्रँड इंडिया’ असते आणि भारताचे नाव असते, म्हणून परदेशात पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनांची आणि फळांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाही, असे राज्यमंत्री जतिन प्रसाद यांनी राज्यसभेत सांगितले.
भारत देश सध्या ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये ताजी फळे निर्यात करतो. नाशवंत उत्पादनांसाठी, विशेषत: ताज्या फळांसाठी सागरी प्रोटोकॉल विकसित करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करीत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात करणे शक्य होईल. मोदी सरकारच्या कार्यकाळात, भारताने कृषी निर्यातीत नवीन उंची गाठली आहे.
पहिल्यांदाच, देशातील फळांचा माल पाश्चात्य देशांच्या आकर्षक बाजारपेठेत पोहोचला आहे, असे राज्यमंत्री प्रसाद यांनी सांगितले. २०२३ मध्ये अमेरिकेला हवाई मार्गाने ताज्या डाळिंबाची पहिली चाचणी खेप पाठवून अमेरिकेच्या बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्याच्या दिशेने भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे, त्यामुळे पाश्चात्य ग्राहकांमध्ये भारतातील डाळिंब यशस्वी ठरले आहे.
महाराष्ट्रातील केशरी डाळिंबाची निर्यात क्षमताप्रचंड आहे आणि देशातील फळांच्या निर्यातीपैकी सुमारे ५० टक्के निर्यात राज्यातील सोलापूर जिल्ह्यातून होते. सरकारने फळांचे जीआय टॅगिंग केल्याने भारतातील विशेष फळांची बाजारपेठ वाढविण्यास मदत झाली आहे.