१ फेब्रुवारी २०२५ जेऊर : नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची वाढती संख्या व त्यांच्याकडून सुरू असलेल्या पाळीव प्राण्यांच्या शिकारीमुळे वनविभाग अलर्ट मोडवर आला असून गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.तालुका बिबट्यांसाठी नंदनवन ठरत आहे. त्यामुळे पाच वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.वनविभागाचे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र,आर्मीचे (डेअरी फार्म) एक हजार २०० हेक्टर क्षेत्र तर अनेक खाजगी डोंगररांगा तालुक्यात विखुरलेल्या आहेत.
डोंगरदऱ्यांनी हरिण, काळवीट, ससा, खोकड, मोर, रानमांजर, रानडुक्कर, उदमांजर अशा विविध वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आढळतो.मोठ्या प्रमाणात लपण व इतर वन्य प्राण्यांचा वावर असल्याने बिबट्यांसाठी सहज खाद्य उपलब्ध होते.त्यामुळे तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.चालू आठवड्यात जेऊर तसेच निमगाव घाणा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यांना वनविभागाच्या वतीने रेस्क्यू करण्यात आले आहे.तालुक्यातील जेऊर पट्टा तसेच अकोळनेर, भोरवाडी पट्टयात दररोज बिबट्यांकडून वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत.
एका वर्षात सुमारे चारशे वरून अधिक पाळीव प्राण्यांच्या शिकारी बिबट्या कडून तालुक्यात झालेल्या आहेत. गाय, घोडा, कालवड, शेळी, मेंढ्यांच्या शिकारी बिबट्यांकडून करण्यात आलेल्या आहेत.याचबरोबर अनेक पाळीव कुत्र्यांचा देखील फडशा बिबट्यांकडुन पाडण्यात आलेला आहे.बिबट्यांची वाढती संख्या व त्यांच्याकडून होणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या शिकारी या पार्श्वभूमीवर वनविभाग अलर्ट मोडवर आला आहे.वनविभागाच्या वतीने जनजागृती अभियान सुरू केले आहे.बिबट्या बाबत वनविभाग जागृत झाला असून मानवावर होणाऱ्या हल्ल्यांपूर्वीच वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रालगत राहणारे शेतकरी, नागरिक तसेच ग्रामस्थांना संरक्षण व इतर माहिती देण्यात येत आहे.
नगर परिमंडळात वनपाल विजय चेमटे, वनरक्षक नितीन गायकवाड, वनरक्षक बाळासाहेब रणसिंग तर गुंडेगाव परिमंडळामध्ये वनपाल शैलेश बडदे, बनरक्षक अर्जुन खेडकर, वनरक्षक कृष्णा गायकवाड तसेच जेऊर परिमंडळामध्ये वनपाल मनेष जाधव, वनरक्षक अमोल गोसावी यांच्यासह वन्य कर्मचाऱ्यांच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.वनविभागाकडे पुरेसे मनुष्यबळ देखील उपलब्ध नाही.त्यामुळे नागरिकांनीच स्वतः होऊन बिबट्या बाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.बिबट्या बाबत नागरिकांनी तसेच शेतक-यांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती गावोगावी देण्यात येत आहे. बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.- अविनाश तेलोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग
भविष्यात एखादी दुर्घटना घडू नये यासाठी वनविभागाच्या वतीन जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात येते,तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.मानव वस्तीत देखील बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे.तरी सर्व नागरिकांनी, शेतक-यांनी आपली व विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी.- मनेष जाधव, वनपाल, जेऊर परिमंडळ