२५ जानेवारी २०२५ कर्जत : तालुक्यातील खांडवी येथे एक वर्षाच्या चिमुकल्या मुलासह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.मात्र, आत्महत्येचे कारण समजले नाही.तालुक्यातील खांडवी येथील साक्षी कुमार कांबळे (वय २३) व एक वर्षाचा मुलगा स्वरूप असे मृतांची नावे आहे.
याबाबत किशोर परशुराम कांबळे (वय २४) रा. खांडवी ता. कर्जत जि. अहिल्यानगर यांनी मिरजगाव पोलिस स्टेशनला माहिती दिली.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दिलेल्या खबरीवरून माझ्या घराशेजारील माझा चुलत भाऊ कुमार कैलास कांबळे हा त्याच्या कुटुंबासोबत रहावयास आहे.
चुलत भाऊ कुमार कुमार व त्याची पत्नी साक्षी (वय २३) यांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला होता.त्यास एक वर्षाचा मुलगा स्वरूप आहे.त्याची सासू ताराबाई ही देखील तिच्या कुटुंबासह कुमार कांबळे यांच्या घराशेजारीच राहते.
बुधवार दि. २२ रोजी दुपारी २ वाजता मी माझ्या घरी आलो असता,आमच्या शेजारी राहणारे कुमार व त्याची सासू ताराबाई हे साक्षीला मोठमोठ्याने आवाज देत होते. परंतु साक्षीने दरवाजा न उघडल्याने कुमार व त्याची सासू ताराबाई यांनी खिडकीतून पाहिले.
त्यामुळे मी देखील त्यांच्या जवळ जाऊन खिडकीतून पाहिले असता, चुलत भाऊ कुमार याची पत्नी साक्षी व त्याचा मुलगा स्वरूप हे घराचे पत्राचे खाली असलेल्या लोखंडी अॅगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसत होते.त्यानंतर आम्ही घराचा दरवाजा दगडाने होल पाडून दरवाजाची कडी उघडली.
त्यानंतर मी, कुमार व ताराबाई घोडके अशांनी त्यांना खाली घेतले.त्यानंतर पोलिसांना फोन केला.त्यावेळी मिरजगाव पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी आले. मयत साक्षी व स्वरूप यांना मिरजगाव जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.
यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मिरजगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार अनिल भोसले हे करत आहेत.