Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमधून गेल्या आठ पंधरा दिवसांपासून महिला भगिनींना शनिशिंगणापूर व शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाची मोफत व्यवस्था करून देण्यात आल्याने प्रत्येक गावात यायचं का देवदर्शनाला अशी एकच चर्चा सध्या महिला भगिनींमध्ये होत आहे.
खासदार सुजय विखे पाटील व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील सर्व लहान मोठ्या गावातील महिलांना देवदर्शनाची वारी घडवण्याचा उपक्रम विखे व कर्डिले यांनी हाती घेतला असून, या उपक्रमाला प्रत्येक गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,
देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविक महिलांची चहा, नाश्ता जेवणासह सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याने खा. विखे पाटील यांच्या या दर्शनवारीची गावागावात चांगलीच चर्चा रंगली आहे.
बुधवारी शिराळ येथे माजीमंत्री कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिराळ येथून चिचोंडी, धारवाडी, गीतेवाडी, डमाळवाडी, पारेवाडी, भोसे, वैजू बाभळगाव, करंजी, अशा विविध गावांतून महिला दर्शन वारीसाठी मार्गस्थ झाल्या.
विविध गावांतील महिला भगिनींना दर्शनवारीची मोफत व्यवस्था करून दिली असली तरी आम्ही काही मोठे काम केले नाही, देवाकडे महागायचेच असेल तर आमच्यासाठी काही मागू नका तर शेतकऱ्यांसाठी भरपूर पाऊस पडू दे, एवढी एकच मागणी देवाकडे करा, असे भावनिक आवाहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित महिलांसमोर केले.