सध्या कोपरगाव शहराला गाळमिश्रित पाणी देऊन प्रशासन शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. हा गढूळ पाणीपुरवठा तातडीने बंद झाला नाही, तर मुख्याधिकाऱ्यांनाच ते पाणी पिण्यास भाग पाडू, असा इशारा भाजपाचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दिला आहे.
याबाबत पत्रकात काले यांनी म्हटले, की गेली दोन वर्षे एकहाती कारभार हाकणारे प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे गढूळ पाण्याबाबत सोयीस्कर मौन बाळगून आहेत. पालिकेत ठराविक जणांना हाताशी धरले जात असल्याची चर्चा आहे.
कर देऊन नागरिकांना मात्र अस्वच्छ पाणी नशिबी आहे काय असा सवाल काले यांनी विचारला आहे. त्यांनु पुढे म्हटले, की कोपरगाव शहराला चार दिवसाआड पाणी देणे शक्य आहे, मात्र लोकप्रतिनिधी, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि मुख्याधिकारी असे तिघे मिळूनच शहराचा कारभार करीत आहेत.
दुष्काळजन्य परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन होण्याचे होणे आवश्यक असताना अधिकारी मात्र कोणाला तरी खुश करण्यात व्यस्त आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेचे हाल होत असल्याचा आरोप काले यांनी केला आहे.
काले यांनी पुढे म्हटले, की शहराला स्वच्छ पाणी पुरवले जात नाही हे दुर्दैव आहे. पालिका प्रशासनावर लोकप्रतिनीधींचा वचक नाही. त्यामुळे नागरीकांना वेठीस धरून वागणारे गोसावी हे मनमानी कारभार करून जनतेचे हाल करीत आहेत.
पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येते. यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात आम्ही नेहमी स्वच्छ पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले. अनेकदा निवेदन दिले, परखड मत मांडले; मात्र शहरात निद्रिस्तपणे कारभार सुरू आहे, अशी टीका काले यांनी केली आहे.
आवर्तन उशिराने सुटले. दरम्यान साठवण तळ्यातील पाणी तळाला गेले होते. नुकतेच आवर्तन सुरू झाल्यामुळे तळ्यात नवीन पाण्याची आवक झाली. पाणी खाली वर झाल्याने काळजी घेऊनही काही ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. काळजी घेतली गेली; मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आमचे प्रयत्न सुरूच आहेत. येत्या एक-दोन दिवसात स्वच्छ पाणी येईल. – शांताराम गोसावी, मुख्याधिकारी