मागील दोन दिवसांपासून अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी, संगमनेर व पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलावर पाणी आले असून त्यामुळे महसूल प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी काल रविवारी (दि.४) बंद केला आहे.
त्यामुळे संगमनेर व पारनेर तालुक्याचा संपर्क तुटला आहे. अकोले तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुलावर पाणी आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.
यामुळे पारनेरकडून संगमनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांबच लांब गाड्यांच्या रांग लागली होती. मुळानदी पात्राच्या बाहेर पाणी गेल्यामुळे अनेक गावात पाणी शिरू शकते. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन मुळा नदीला पूर आला होता; परंतु या पारनेर- संगमनेर तालुक्याला जोडणारा मांडवे- साकुर पुलावरून पाणी गेले. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाहतूक बंद होती.
रविवारी रात्री उशिरापर्यंत मुळा नदीचे पाणी कमी झाले नव्हते. पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.