अहिल्यानगर : महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयाची तपासणी करुन दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने नोंदणीकृत २३० पैकी २१५ रुग्णालयांची तपासणी पूर्ण केली आहे. त्यात त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या ३२ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
खासगी रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम, २०२१ अंतर्गत नियमांचे काटेकोर पणे पालन होते किंवा नाही, याची खातरजमा या तपासणीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्राधान्याने रुग्णालयामध्ये आकारण्यात येणा-या फी व इतर रुग्णालयीन सेवेचे शुल्क, दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागांत लावण्यात यावे. तसेच महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ मधील अंतर्भूत रुग्ण हक्क संहिता रुग्णालयाच्या दर्शनी भागांत स्वच्छ अक्षरात लावण्यात आले आहेत का, याची तपासणी करण्यात आली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-87-1.jpg)
पथकाने केलेल्या तपासणीत चार रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. तीन रुग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार परवाना नूतनीकरण केलेला नाही. तर, दहा रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात दर सूची लावण्यात आलेली नाही. मंजूर खाटा व प्रत्यक्ष खाटा यात तफावत असलेली १० रुग्णालये आढळून आली.
पाच रुग्णालयांमध्ये बायोमेडिकल वेस्टची व्यवस्था नसल्याचे तपासणीत समोर आले.अशा एकूण ३२ रुग्णालयांना आरोग्य विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. महिनाभरात त्यांनी त्रुटींची पूर्तता न केल्यास त्यांचा रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.