अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Corona Breaking :- शहरातील खड्डेमय रस्ते, ठिकठिकाणी साचलेले घाण पाण्याचे डबके, शहरातील अस्वच्छता, पसरलेले साथीच्या आजाराने शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना, विजयादशमीच्या दिवशी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिकेचे नामांतर ढब्बू मकात्या महापालिका करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
शुक्रवार दि.15 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला नागरिकांच्या वतीने सिमोल्लंघन करीत ढब्बू मकात्याशाही संपविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. नालेगाव येथील अमरधामवर महापालिका नामांतरचा फलक लावण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
महापालिकेने शहरातील रस्त्यावरील खड्डे महिन्याच्या मुदतीत बुजवलेले नाहीत. काही ठिकाणी खड्डयांची करण्यात आलेली पॅचिंग देखील पावसाने वाहून गेली आहे. शहरात रस्त्यांचे काम निकृष्ट होत असल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच इतर नागरी सुविधा पुरविण्यास देखील महापालिका उदासीन राहिली असल्याने महापालिकेचे नांमांतर करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. भारताचे लोहपुरुष स्व. वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासून देशातील ढब्बू मकात्याशाही संपविण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात येत आहे. ढब्बू मकात्या शाहीतून महाराष्ट्रासह देशात घराणेशाही संस्थाने निर्माण झालेली आहेत. स्व. वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थाने खालसा करून जी ऐतिहासिक कामगिरी केली, हा आदर्श व विचार समोर ठेऊन ढब्बू मकाते शाहीतील घराण्यांची संस्थाने सत्ता स्थानातून संपवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. इंग्रजांना या देशातून हाकलून लावले.
परंतु देशातील कोट्यावधी सामान्य नागरिकांवर शासन, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची आलेली जबाबदारी पेलली नाही. उलट होईल ते होऊ दे, मला काय त्याचे? म्हणजेच मकात्या प्रवृत्ती देशभर जोपासली गेली आणि त्यातून शासन प्रशासनामध्ये अनागोंदी, भ्रष्टाचार आणि टोलवाटोलवी पोसली गेली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये उन्नत चेतना, तुफानी ऊर्जा आणि माहिती गंगेचा वापर करून या आंदोलनाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याची फळे सामान्य माणसाला पंचात्तर वर्षात देखील मिळाली नाही. कोट्यवधी लोकांना स्वतःच्या मालकीचा निवारा नाही. अनेक लोकांना बेरोजगारीच्या खाईत खस्ता खाव्या लागत आहेत.
त्यामुळे देशातील ही ढब्बू मकात्याशाही संपविण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना नागरिकांच्या सोयीसुविधा अजिबात जाणीव नसल्याने ही ढब्बू मकातेशाहीच्या निषेधार्थ महापालिकेचे नामांतर करुन आंदोलन केले जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम