अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यातील जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीचा खून झाल्याच्या घटनेचा तपास पोलिसांकडून काढून तो आता सीआयडीकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अल्पवयीन शाळकरी मुलीच्या खून झाल्याच्या घटनेला दहा दिवस पूर्ण झाले तरी पोलिसांच्या तपासात प्रगती नसल्यामुळे ही मागणी जवळ्यातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या दहा दिवसांत पोलिसांनी गावातील पंचवीस ते तीस जणांना संशयित म्हणून तपासले असून त्यांच्याकडून काहीही महत्त्वाचे धागेदोरे अद्याप मिळाले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
अज्ञात आरोपीकडून भरदिवसा या शाळकरी बालिकेचा निर्घुन खून झाल्यामुळे जवळा ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन पुकारले होते. परंतु पोलिसांनी तपासाला वेळ लागत आहे, ज्यांना तपासले ते वारंवार जबाब बदलत आहेत, असे आमच्या तपासात निष्पन्न होत आहे,
त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारेच तपास चालू आहे असे पोलिसांकडून सांगण्यात येते. या घटनेला पोलिसांनी गांर्भीयाने घेतले आहे. वरीष्ठ अधिकारी तपासावर बारकाईने लक्ष ठेवून असून त्यांनी वारंवार घटनास्थळी भेटी दिल्या आहेत. या घटनेत बालिकेचा अत्याचार करून खून करण्यात आलेला आहे.
तसा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला आहे. परंतु झालेले अत्याचार व त्याबाबतची माहिती न्याय वैद्यकीय तपासणी अहवालानंतर निष्पन्न होणार आहे. अत्याचार झालेला असल्याचे गृहीत धरून मयत बालिकेच्या घरी जाणे-येणे असणारे व घराशेजारी राहणारे दहा ते बारा संशयितांच्या जनुकीय (डीएनए) तपासनीसाठी नमुने पाठवण्यात आलेले आहेत.
विशेष बाब म्हणून लवकरात लवकर तो अहवाल मिळण्यासाठी प्रयत्न चालु असल्याचे पोलिसांनी ग्रामस्थांना सांगीतले. मयत मुलीच्या अंगावरील पुराव्यांचे नमुने संशयितांशी जुळले तर आरोपी लवकर निष्पन्न होईल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













