८ जानेवारी २०२५ शिर्डी : साईभक्तांबद्दल मनात प्रचंड आदर आहे. आपण साईभक्तांमध्ये साईबाबांना बघतो, साईभक्तांविषयी मनात कधीच चुकीची भावना नसते, माझा आक्षेप साईभक्तांवर कधीच राहिला नाही. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.मात्र, बाहेरून अनेक जण येतात शिर्डीत भिक्षेकऱ्यांचे सोंग घेऊन प्रसादालयात मोफत जेवतात आणि नशापाणी करून साईभक्तांना व नागरीकांना त्रास देवून गुन्हेगारी वाढवतात, त्यावर माझा आक्षेप होता व आहे.
मग अशा प्रवृत्तीचा तसेच गुन्हेगारीचा बंदोबस्त करायचा नाही का,असा सवाल माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.शहरातील गायके वस्ती येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील नुकतेच बोलत होते.याप्रसंगी शिर्डी शहरातील विविध संस्थांचे तसेच नगरपरिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, माझ्या इतक्या छोट्या वक्तव्याची दखल महाराष्ट्राने घेतली हे विशेष,परंतु अनेकांना हे माहित नाही की, शिर्डीत दररोज गाड्यांमध्ये भिकारी भरून आणून येथे सोडले जातात.ते दुपारी प्रसादालयात मोफत जेवतात.अनेकजण दारू पिऊन प्रसादालयात जातात.व्हाईटनरची नशा करून साई भक्तांशी चुकीचे वागतात भक्तांना छळतात, त्यामुळे शिर्डी शहराबरोबरच माता भगिनींची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते,ही सुरक्षितता जपण्याचे काम आपले आहे.
विखे पाटील परिवार असो अथवा शिर्डीकर आपण सर्वजण साईभक्तांमध्ये साईबाबांना बघतो, साईभक्त येतात म्हणून आपले प्रत्येकाचे घर चालते.त्यामुळे साई भक्तांबद्दल आपला आक्षेप कधीच राहिला नाही.मात्र भिकारी बनून येतात आणि शिर्डीत गुन्हेगारी वाढवतात.वेगवेगळ्या प्रकारची नशा करून महिलांच्या तसेच साईभक्तांच्या सुरक्षिततेला जर कोणी धोका पोहोचू पाहत असेल तर त्यांचा बंदोबस्त करणे गैर काय, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आवरायला नको का, या प्रश्नी माझ्यावर कोण काय टीका करतात किंवा काय स्टेटमेंट देतात याला माझ्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही.
कुणाच्या सर्टिफिकेटची विखे पाटील परिवाराला आवश्यकता नाही. पुढील पाच वर्षात बदललेल्या शिर्डीकडे आपणास वाटचाल करायची आहे. त्यादृष्टीने अनेक प्रकल्प आपण राबवत आहोत. ४० कोटी रुपयांच्या साईबाबांच्या थिम पार्कचे टेंडर निघाले असून थिमपार्क मधील लेझर शोमध्ये शिर्डीसह परिसरातील तालुक्यातील मुलांच्या रोजगाराचे व उज्वल भविष्याचे स्वप्न जडलेले आहे.
शिर्डीतील वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारीची घाण पुढील तीन महिन्यात साफ करून साईभक्त व नागरीकांना छळणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करणार आहे. त्यामुळे महिला भगिनी व भाविकांची सुरक्षितता अधिक बळकट होईल.मी शिर्डीतील साईभक्तांबद्दल बोललो नव्हे तर भिकाऱ्यांच्या माध्यमातून वाढती गुन्हेगारी बद्दल बोललो होतो.परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून कुठलेही वक्तव्य मागे घेणार नसल्याचे यावेळी डॉ. विखे यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला साईबाबा संस्थानवर काम करण्याची संधी दिली तर मला अधिक आवडेल,साईभक्त तसेच ग्रामस्थ केंद्रस्थानी ठेवून शिर्डी शहरात विकासात्मक दृष्ट्या अभूतपूर्व परिवर्तन करून दाखवू.शिर्डी शहरात महसूल भवन तसेच थीम पार्क लेझर शो, एमआयडीसी, पशुवैद्यकीय महाविद्यालय, क्रिकेट स्टेडियम उभे राहणार व तेथे आयपीएल मॅचेस खेळवली जाणार आहे.त्यानंतर या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शिर्डी शहर व तालुक्याच्या अर्थकारणाला अधिक गती मिळेल, – माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील.