अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेल्या जायकवाडी धरण क्षेत्रात सोमवारी अचानक मोठे गूढ आवाज आले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मात्र हे आवाज नेमके कशाचे आहेत, याचे उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना देता आले नाही. विशेष बाब म्हणजे गेल्या 5 वर्षात पैठण तालुक्यात अनेक वेळा भूगर्भातून गूढ आवाज आले.

आवाजाचा तपास करण्यासाठी मागील वर्षी भूवैज्ञानिक येथे येऊन गेले, तरीही त्यावर अद्याप उत्तर मिळालेले नाही. यातच सोमवारी पुन्हा एकदा मोठा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
पैठण परिसरात अशा प्रकारच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. भूकंप किंवा धरण फुटण्याची भीती वाटते, मात्र लवकरच या आवाजाचे रहस्य उघड केले जाईल.
तरीही या आवाजाचा धरणाला कोणताही धोका नाही, असे पाटबंधारे विभागाचे अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान दोन वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने शासनाला या आवाजाचे कारण शोधण्यासाठी पत्रव्यवहार केल्याने नागपूर येथील भारतीय भूवैज्ञानिक, संशोधन विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक या आवाजाचे कारण शोधण्यासाठी आले.
त्यांनी येथील खडक, मातीचे नमूनेही घेतले होते. मात्र त्या अहवालाचे पुढे काय झाले, हे कुणालाच माहिती नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम