Ahmednagar News : नगर अर्बन मल्टिस्टेट को- ऑप. बँकेचा परवाना रद्द प्रकरण दोषींवर कडक कारवाई करा !

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नगर अर्बन मल्टिस्टेट को- ऑप. बँकेचा परवाना रद्द होण्याच्या घटनेबाबत बँकिंग वर्तुळासह नागरिकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी आता सभासद वर्ग आक्रमक झाला असून, लवकरच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डी. एम. कुलकर्णी यांनी दिली आहे.

नगर अर्बन बँकेचा परवाना दोन दिवसांपूर्वीच आरबीआयने रद्द केला. त्यामुळे बँकेचे कामकाज बंद झाले आहे. बँक मोठी करण्यात अनेकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. परंतु आज ही बँक अशा पद्धतीने बंद होणे अनेकांना रुचलेले नाही.

बँकेच्या या परिस्थितीला सभासदांची निष्क्रियता, उदासीनता, तसेच असंघटित ठेवीदार, बेजबाबदार अधिकारी वर्गाची चेअरमनला मिळालेली साथ या बाबी जबाबदार असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी आणि दोषी संचालक, अधिकाऱ्यांना जबर शिक्षा होण्यासाठी ठेवीदारांची मजबूत संघटना उभी करावी लागणार आहे.

बँकेच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर भविष्यात उद्भवणारे संकट याचा विचार होण्याची आज गरज आहे. तसेच पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होऊनही कारवाईला विलंब होत असल्याबाबत पोलिस अधीक्षकांना जाब विचारण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी ठेवीदार, सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील खाकीदास बाबा मठ, लालटाकी रोड येथे सायंकाळी ४ वा. ही बैठक होणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे. या बैठकीत बँक बचाव समितीचे सदस्य मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस सभासद, ठेवीदार, विद्यमान सेवक यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe