राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची जमीन विकणे आहे… अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सिने जगतात एकच खळबळ उडाली. ख्वाडा, बबन आणि टीडीएम असे एका पाठोपाठ एक हीट चित्रपट देणारे भाऊराव मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत असे या पोस्टवरून समजल्यानंतर चाहत्यांच्या काळजात धस्स झाले.
भाऊराव जमीन विकू नका, आपण सर्व मिळून मार्ग काढू, अशी भावनिक साद चाहत्यांनी घातली आहे. गेल्याच महिन्यात भाऊराव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारित फकिरा चित्रपटाची घोषणा केली त्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
सिने चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच काल अचानक भाऊराव यांनी जमीन विकणे आहे… अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि एकच खळबळ उडाली.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या भाऊराव यांच्या टीडीएम चित्रपटाची या क्षेत्रातील प्रस्थापितांनी गळचेपी केल्यानंतर भाऊराव अडचणीत आले होते. दुसरीकडे प्रेक्षकांनी हा सिनेमा मात्र डोक्यावर घेतला होता. त्यावेळी भाऊराव यांनी सोशल मीडियावर आपल्या डोळ्यातील अश्रुंसह कैफियत मांडली होती.
प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. परंतु त्यानंतर या सिनेमाला स्क्रिन मिळत नसल्याचं समोर आलं होतं. हा सिनेमा पाहता येत नसल्यानं प्रेक्षकांची घोर निराशा झाली होती.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा ख्वाडा सिनेमा खूप गाजला. बबन सिनेमाचीही चर्चा झाली. त्यानंतर त्यांचा टीडीएम हा सिनेमा आला. काही महिन्यांपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यांच्या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे त्यांचा सिनेमा मातीतला असतो, मातीतल्या लोकांनी बनवलेला असतो.
ग्लॅमरस चेहरे, लोकेशन्स असं काही नसताना त्यांच्या सिनेमांची नेहमीच चर्चा होताना दिसते. त्यांच्या या हटके सिनेमातल्या लव्हस्टोरी प्रेक्षकांना नेहमीच आवडल्या आहेत. दरम्यान, भाऊराव कऱ्हाडे यांनी ख्वाडा, बबन यासारख्या अस्सल गावरान ढंगातील, रंगातील सिनेमा प्रेक्षकांसमोर आणत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ख्वाडाच्या वेळीही विकली होती जमीन !
ख्वाडा हा भाऊराव यांचा पहिला चित्रपट या चित्रपटाच्या वेळी ही अनेक अडचणी आल्या, त्यावेळीही त्यांना स्वतःची जमीन विकावी लागली होती. मात्र त्यानंतर ख्वाडा ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांबरोबरच त्यावर राष्ट्रपती पुरस्काराची मोहोर उमटली. त्यानंतर आलेला बबनही सुपरहिट ठरला.
त्यावेळी आर्थिक अडचणीतून बाहेर पडत भाऊरावांनी विकलेली जमीन परत घेतली. आताही जमिन विकू नका, अशी भावनिक साद घातलेल्या चाहत्यांना भाऊरावांनी आपण परत जमीन घेऊ, अशा शब्दांत दिलासा दिला आहे.