दिशा विकासाची.. पुरोगामी विचाराची हे ब्रीदवाक्य व नवसंकल्प घेऊन २०२५ या वर्षभरात सामाजिक समता, विकासाच्या वेगवेगळ्या दिशा, पक्ष संघटन मजबूत करणे यासह इतर विषयांवर मंथन करण्याकरिता साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय पदाधिकारी शिबिर आजपासून सुरू होत आहे.
या शिबिरास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली
पत्रकार परिषदेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित शेळके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, साईबाबांच्या शिर्डी नगरीत बाबांचा आशीर्वाद मिळतो. आत्मविश्वास ऊर्जा व मोठी प्रेरणा मिळते. लोकसभेत पक्षाला फारसे यश मिळाले नाही तेव्हा आमच्या पक्ष नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र त्यांना त्याचे उत्तर विधानसभेत मिळाले. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने आम्हाला अभतपूर्व यश दिले आहे.
त्यामुळे आगामी काळात विकासाच्या वेगवेगळ्या योजना तसेच पक्ष संघटन यासह पाच वर्षाकरिता इतर विषयांवर मंथन होणे गरजेचे आहे. त्याकरिता शिर्डी येथे शिबिर घेतले आहे. संभाजीनगर येथे हे शिबिर होणार होते परंतु त्या ठिकाणी मर्यादित सदस्य संख्या ठेवली होती. त्यामध्ये अचानक वाढ झाल्याने व कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्याने ऐनवेळी हे शिबिर शिर्डी येथे घेण्याचे ठरवले.
अधिवेशनासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, मंत्री धनंजय मुंडे, आजी-माजी आमदार, खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.आ. आशुतोष काळे व जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या शिबिरासाठी व्यवस्था केले आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरण संदर्भात सवाल विचारला असता गुन्हेगार व मास्टरमाइंड यांचा कसोशीने तपास होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही सुरुवातीपासून पक्षाची भूमिका आहे. त्यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. मंत्री धनंजय मुंडे या शिबिरास उपस्थित राहतील, असा विश्वास सुद्धा यावेळी त्यांनी बोलून दाखविला.
उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते व राज्यभरातील प्रमुख नेते पक्षाचे मंत्री आमदार खासदार पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण होईल, त्यानंतर शिबिरास प्रारंभ होणार आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ या शिबिरास उपस्थित राहणार का? असा सवाल विचारला असता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, माजी मंत्री छगन भुजबळ पक्षातील ज्येष्ठ नेते असून पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा आहे. मी त्यांच्याशी स्वतः चर्चा केली व त्यांना शिर्डी येथील शिबिरास येण्याची विनंती केली आहे. ते या शिबिरास उपस्थित राहतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली यावर प्रश्न विचारला असता बीड परभणी तसेच सैफ अली खान यांच्या बाबतच्या घटना दुर्दैवी आहेत. यात प्रश्न नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत कार्यक्षम आहेत. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यातील स्थिती चांगली हाताळली होती. आताही ते पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे हाताळतील यात शंका नाही, असे तटकरे म्हणाले.