दूधाला हमीभाव देणे अतिशय गरजेचे आहे. दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. संगमनेर शहरातील श्रमिक मंगल कार्यालयात आयोजित दूध परिषदेमध्ये बोलताना उत्पादकांनी हा इशारा दिला.
येथील श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारी (दि.९) दूध परिषद आयोजित करण्यात आली होती. शेतकरी नेते संतोष रोहम, अनिल नवले, साहेबराव वलवे, अमित नवले, सागर वाकचौरे, ऋषिकेश गुंजाळ, दत्ता ढगे, हरीश लांडगे, सूर्यभान नवले आदींसह संगमनेर व अकोले तालुक्यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दूध परिषदेमध्ये दूध उत्पादकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक नवले म्हणाले, राज्यात अहमदनगर जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे.
उत्पादन खर्चाचा विचार केला तर दूधाला अतिशय कमी बाजार मिळतो, म्हणून उत्पादन खर्चावर आधारित दूधाला सातत्याने दरवाढ मिळाली पाहिजे, अनुदान नको तर दूधाला ऊसा सारखा एफआरपी प्रमाणे शाश्वत व किफायतशीर भाव मिळाला पाहिजे.
यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, यासाठी लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष रोहम म्हणाले, दूधाच्या प्रश्नाला राजकीय स्वरूप देण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून राजकारण करत आहे.
शेतकरी असलेल्या पुढाऱ्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून साहेबराव नवले यांनी सुरू केलेल्या या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी साहेबराव वलवे, दत्ता ढगे, सागर वाकचौरे, ऋषिकेश गुंजाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. दूध दर वाढीसाठी यापुढे निर्णायक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या दूध उत्पादकांनी दूध परिषदेमध्ये दिला आहे.