Ahmednagar News : नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्ता नागरिकांसाठी धोकादायक !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातून जाणाऱ्या व राष्ट्रीय महामार्गातंर्गत असलेल्या नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली आहे.

गाडळकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर शहरासह बाहेरील वाहनांची वर्दळ असते.

रस्त्यावरील लहान-मोठया खड्डयांमुळे रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. या खराब रस्त्यावरुन येण्या-जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तर शालेय विद्यार्थ्यांनादेखील या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीच्या फुफाट्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सध्या नवरात्र उत्सव व दिवाळी सणाच्या खरेदीसाठी महिला वर्ग आणि कुटुंबातील सदस्य मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असतात. नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्त्यावरुन जाताना जीव मुठीत धरुन नागरिकांना जावे लागत आहे.

या रस्त्यावर गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता दुरुस्त करावा. दत्ता गाडळकर (शहर सचिव, भाजप)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe